शहागड (जालना ) : औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला सुरुवात होऊन दोन वर्षाचा कालावधी लोटला आहे. तरीही शहागड येथील बागवान समाजाच्या स्मशानभूमीच्या जागेचा तिढा अजूनही सुटलेला नाही. यामुळे संतप्त समाजबांधवानी उड्डाणपुलाचे काम बंद पाडून ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.
औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात बागवान समाजाची स्मशानभूमीची जागा संपादित केली आहे. स्मशानभूमीसाठी जागा देण्यात येईल असे जमिनी संपादन करतांना आश्वासन देण्यात आले होते. मात्र दोन वर्षाचा कालावधी उलटूनही यावर अद्यापही कुठलाच निर्णय झाला नाही. याबाबत महामार्गाचे काम करत असलेल्या संबधीत कंपनीचे पदाधिकारी, महसूलचे अधिकारी आणि समाजबांधवात अनेक वेळा जागेविषयी बैठका झाल्या. मात्र तोडगा निघू शकला नाही. निव्वळ आश्वासन देण्यात येत असल्याचे समाजबांधवाचे म्हणणे आहे. परिसरात महामार्गाचे काम वेगाने सुरु आहे. स्मशानभूमीच्या जागेवर उड्डाणपुल होत आहे. संपादीत केलेली जमिनीच्या मोबदल्यात तितकीच जागा परिसरात इतरत्र देण्यात यावी या मागणीसाठी बागवान समाजबांधवानी उड्डाणपुलावर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.