बाबासाहेब म्हस्के ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आगामी खरीप व रबी हंगामासाठी १४६८ कोटी रुपयांचे कृषी कर्जवाटपाचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाने निश्चित केले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यामध्ये ५५ कोटी ४४ लाख रुपयांची वाढ करण्यात आली आहे. कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतक-यांनाही नव्याने कर्ज वितरित केले जाणार आहे.जिल्ह्यात पाच लाख ३५ हजार शेतकरी संख्या आहे. यामध्ये अल्प व अत्यल्प भूधारक शेतक-यांची संख्या चार लाख सात हजार असून सर्वसाधारण जमीन धारणा एक हेक्टर २६ आर इतकी आहे. मागील आर्थिक वर्षात (वर्ष-२०१७-१८) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, व्यापारी व ग्रामीण बँकांना मिळवून जिल्ह्यासाठी १४११ कोटी ६६ लाख रुपये कृषी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित केले होते. मात्र, खरीप हंगामाच्या सुरुवातीपासून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीची प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे नवीन कर्ज मिळविण्याऐवजी कर्जमाफीचे आॅनलाइन फार्म भरण्यासाठी शेतकºयांची मोठी धावपळ उडाली. शिवाय कर्जदार बँकांनाही शेतक-यांची विविध प्रकारची माहिती आपले सरकार या आॅनलाइन पोर्टलवर सातत्याने अद्ययावत करावी लागली. कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळायला वर्षभराचा कालावधी लागल्यामुळे बँकांना कृषी पतपुरठ्याचे निर्धारित उद्दिष्ट गाठता आले नाही. कर्जमाफी प्रक्रियेच्या गोंधळात नियमित कर्जफेड करणाºया बहुतांश शेतक-यांना नव्याने कृषी कर्ज मिळू शकले नाही. परिणामी गत आर्थिक वर्षात १४११.६६ कोटींपैकी केवळ २७७.१८ कोटींचे कृषी कर्जवाटप झाले. मात्र, या आर्थिक वर्षात बहुतांश थकबाकीदार शेतकरी कर्जमाफीचा लाभ मिळाल्यामुळे नव्याने कर्ज घेण्यास पात्र ठरणार आहेत. त्यामुळे यंदा कृषी पत पुरवठ्याचे उद्दिष्ट ५५ कोटी ४४ लाख रुपयांनी वाढविण्यात आले आहे.चालू आर्थिक वर्षात कृषी पतपुरवठ्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी बँक अधिका-यांची बैठक घेण्यात येणार आहे. अधिकाधिक शेतक-यांना कृषीकर्ज वाटप करण्याच्या सूचना सर्व बँकांना देण्यात येणार आहे.- निशांत ईलमकर,व्यवस्थापक जिल्हा अग्रणी बँक
साडेचौदाशे कोटींचा कृषी पतपुरवठा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 12:54 AM