गतवर्षापासून देशासह राज्यात कोरोनाने धु्माकूळ घातला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी शासनाला वेळोवेळी लॉकडाऊनसह कडक निर्बंध लागू करावे लागत आहे. याचा परिणाम व्यवहारावर होत असून, सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. मध्यंतरी कमी झालेली रुग्णसंख्या मागील दोन महिन्यांपासून वाढत आहे. शासनाने ब्रेक द चेनअंतर्गत कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे गतवर्षीप्रमाणेच याही वर्षी अक्षयतृतीयेचा मुहूर्त हुकला आहे. त्यामुळे वरपिता व वधूपिता चिंतेत आहेत.
नियमांचा अडसर
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाने ब्रेक द चेनअंतर्गत निर्बंध लागू करण्यात आले आहेत. काही कार्यक्रम घ्यायचा असल्यास शासनाने काही अटी घातल्या आहेत. त्यामुळे अनेक कार्यक्रम रद्द करीत आहेत. काही जण मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत लग्नसोहळे उरकून घेत आहेत.
मे महिन्यातील मुहूर्त
मे महिन्यात ११ शुभमुहूर्त आहेत. यात ४, १०, १३, १४, १८, २०, २१, २२, २५, २७ मे रोजी शुभमुहूर्त आहेत.
मंगल कार्यालयाचे गणित बिघडले
सलग दुसऱ्या वर्षीही कोरोनाने थैमान घातले आहे. त्याचा सर्वच व्यवहारांवर परिणाम झाला आहे. शिवाय, काही जणांनी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत लग्नसोहळे उरकून घेतले, तर काहींनी रद्द केले आहे. त्यामुळे मंगल कार्यालय चालकांचे गणित बिघडले आहे. मंगल कार्यालयात लग्नसोहळे होत नसल्याने केटरिंग, बॅण्डवाले, मंडपवाले यांच्यावरही उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी होत आहे.