जालना/ आष्टी : लग्नासाठी मुलगी दाखवून माय-लेकाची ४४ हजार रूपयांची फसवणूक करणाऱ्या चौघाविरूध्द आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. ही घटना २६ जुलै रोजी लिंगसा (ता.परतूर) येथे घडली होती. या प्रकरणात पोलिसांनी चौघांना अटक केली.जालना शहरातील शांताबाई शेषराव चव्हाण यांनी आष्टी ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या ओळखीचा असलेल्या चत्रभुज साहेबराव लोंढे (रा. घनसावंगी) याने तक्रारदाराचा मुलगा शिवराज शेषराव चव्हाणच्या लग्नासाठी मुलगी असल्याचे सांगत फोन करून लग्नाच्या तयारीने त्यांना बोलावून घेतले. त्याच्या सांगण्यानुसार ते सातोना येथे गेले. तेथून लोंढे याच्यासह ज्ञानेश्वर द्वारकादास पराडे यांनी त्या दोघांना लिंगसा या गावी नेले. तेथे ग्यानबा पवार याने एकाला बोलाविले. काही वेळानंतर संजय जाधव नामक व्यक्ती एका मुलीला घेऊन तेथे आला.मुलगी पसंत असल्याचे सांगितल्यानंतर संबंधितांनी एक लाख रूपयांची मागणी केली. त्यानंतर ७० हजार रूपये देण्याचे ठरले. त्यांनी ३० हजार रूपये रोख संबंधितांना दिले. तर सोबत आणलेले दागिने मुलीने घेऊन घातले. त्यानंतर ‘पुढील कार्यक्रम तुमच्या पध्दतीने करा’ असे सांगत शिवराज याला सातोना येथे नेऊन सोडले. त्यानंतर मुलगी जाधव यांच्या सोबत येत असल्याचे सांगत चव्हाण यांना सेलगाव येथे नेले. जाधव यांच्या दुचाकीतील पेट्रोल संपल्याचे सांगून लोंढे तेथून निघून गेले. मात्र, बराचवेळ ते परत न आल्याने त्यांनी लगसा येथे पाहुणे भेटलेल्या घरी जाऊन पाहिले. तेथे सापडलेल्या आधार कार्डवर संजय जाधव याचे नाव संजय राठोड असे आढळून आले. तसेच त्याने सांगितलेली जातही वेगळी दिसून आली. त्यावेळी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. या तक्रारीवरून संजय रामराव राठोड (रा. लिंगसा ता.परतूर), चत्रभुज साहेबराव लोंढे, ज्ञानेश्वर द्वारकादास पराडे (दोघे रा. घनसावंगी), ग्यानबा पवार (रा. मानवत जि. परभणी) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी संबंधित आरोपिंना अटक केली. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी एस.डी.बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि एस.बी.सानप, पोउपनि पठाडे, तपासाधिकारी जे.डी.सुक्रे, नापोकॉ चव्हाण, पोकॉ वाघमारे व इतरांनी केली.
लग्नाचे अमिष दाखवून फसवणूक करणारे चौघे पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 12:30 AM
लग्नासाठी मुलगी दाखवून माय-लेकाची ४४ हजार रूपयांची फसवणूक करणाऱ्या चौघाविरूध्द आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
ठळक मुद्देलिंगसा येथील घटना : मुलगी दाखवून घेतले होते दागिने आणि रोकड