जालना : अगोदरच ६० टक्के मराठा समाज ओबीसीत आहे. त्यामुळे ५ कोटी मराठा समाज ओबीसीत येणार हा गैरसमज दूर करा. आपण महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय माघार घेणार नाही. अर्धवट आरक्षणाचा जीआर स्वीकारणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितले आहे. कुणबी प्रमाणपत्रासाठी, ओबीसीत येण्यासाठी आणखी जास्तीचा मार्ग काय यावर आपण अभ्यासकांसमवेत आज बैठक घेणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या दुसऱ्या टप्प्यातील आमरण उपोषणाचा मंगळवारी सातवा दिवस आहे. जरांगे पाटील यांच्याशी मंगळवारी सकाळीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चा केली. झालेल्या चर्चेची माहिती देण्यासाठी जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
जरांगे म्हणाले, ओबीसीच्या यादीत ८३ व्या क्रमांकावर मराठा कुणबी आहे. व्यवसायावर आधारित जाती निर्माण झाल्या आहेत. त्यानुसार आरक्षण दिले आहे. त्यामुळे २००४ च्या जीआरमध्ये दुरूस्ती करावी. समितीकडे अनेक पुरावे आहेत. शासनाला महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला आरक्षण देता येणार आहे. त्याबाबतही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितले आहे. अगोदरच ६० टक्के मराठा ओबीसी आरक्षणात गेला आहे. थोडे राहिले आहेत. गैरसमज दूर करा. उर्वरित थोडा समाज बाकी आहे. त्यामुळे विशेष अधिवेशन घेवून मराठा समाजाला आरक्षण द्या, त्याला चॅलेंज होणार नाही. ज्यांना घ्यायचे ते घेतील ज्यांना घ्यायचे नाही ते घेणार नाहीत. परंतु, अर्धवट घेणार नाही, असेही जरांगे पाटील म्हणाले.