जालना : शहरातील कन्हैय्यानगर ते गांधी चमन येथील रुग्णालय हे जवळपास चार किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी गुरुवारी एका रुग्णवाहिकेला २० मिनिटांचा कालावधी लागला. शहरातील वाहतूक काेंडीचा या रुग्णवाहिकेच्या चालकाला मोठा सामना करावा लागला.
अपघातातील जखमी असो किंवा प्रकृती अत्यवस्थ असलेला रुग्ण असो या रुग्णाला गांधी चमन येथील रुग्णालयात नेताना चालकांना मोठी कसरत करावी लागते. प्रकृती अत्यवस्थ असलेल्या रुग्णांसाठी प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो. परंतु, अनेक वाहन चालक रुग्णवाहिका आलेली असतानाही रस्ता देत नाहीत. तर अनेकजण रुग्णवाहिकेच्या चालकालाच हात दाखवून रुग्णवाहिका थांबविण्याचा इशारा करीत असल्याचा प्रकार गुरुवारी केलेल्या पाहणीत दिसून आला. देऊळगाव राजा, मंठा, अंबड, औरंगाबाद आदी मार्गावरून गांधी चमन येथील रुग्णालयात रुग्ण नेताना रुग्णवाहिका चालकांना वाहतूक कोंडीची अडचण सतत भेडसावते. यादरम्यान, काही नागरिक, वाहन चालक मात्र रुग्णवाहिकेला वाट मोकळी करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही दिसून आले. काहींनी रुग्णवाहिका पाहताच आपले वाहन बाजूला घेतले.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर वेळोवेळी कारवाई केली जात आहे. ठिकठिकाणी बंदोबस्तावर तैनात असलेले पोलीस अधिकारी, कर्मचारी रुग्णवाहिकेला रस्ता मोकाळा करून देतात. रुग्णवाहिकेला कोणी अडथळा आणला तर त्याच्याविरुद्ध नियमानुसार कारवाई केली जाईल.
-पोनि यशवंत जाधव, वाहतूक शाखा
रुग्णाला वेळेत रुग्णालयात दाखल केले तर त्याचे प्राण वाचतात. परंतु, अनेकवेळा रुग्णवाहिका चालविताना शहरातील वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. काही वाहन चालक रस्ता देतात तर काहीजण लवकर रस्ता देत नसल्याने रुग्णालयात रुग्णाला नेताना उशीर होतो.
-कृष्णा जाधव, रुग्णवाहिका चालक
शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळेही करावी लागतेय कसरत
शहरातील कन्हैय्यानगर ते मामा चौकाकडे येणारा रस्ता, अंबड चौफुली ते गांधी चमनकडे जाणारा रस्ता असो अथवा मंठा चौफुलीकडून रुग्णालयाकडे जाणारा रस्ता असो या सर्व रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळेही चालकांना कसरत करीतच रुग्णवाहिका चालवावी लागत आहे.
ना कोणाला आर्थिक दंड, ना कोणाला शिक्षा
रुग्णवाहिका किंवा इतर कोणतेही आपत्कालीन वाहन अडविले तर दहा हजार रुपये दंड किंवा तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा आहे.
रुग्णवाहिका येताच तिला वाट मोकळी करून द्यावी, अशा सूचना वेळोवेळी प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. परंतु, वाहतूक कोंडीत ब्रेक मारतच रुग्णवाहिकेच्या चालकांना वाट काढावी लागते. वाहतूक नियम मोडणाऱ्या चालकांवर कारवाई केली जाते. परंतु, रुग्णवाहिकेला अडथळा करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई झालेली नाही.
३.३० वा. कन्हैय्यानगर
३.५० वा. रुग्णालय
४ कि.मी.
अंतर
२० मिनिटे लागतात