जालना : कोविड-१९ विषाणूच्या तपासणीसाठी राज्य शासनाने आयसीएमआर आणि एनआयव्हीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार हाफकिन संस्थेकडून १२ लाख कीट्स खरेदी केल्या होत्या. या कीट्स सदोष असल्याचे समोर आल्यानंतर त्याचा वापर थांबविण्यात आला असून, या प्रकारणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी समितीची स्थापना केली असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
वैद्यकीय शिक्षणमंत्री देशमुख यांनी नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेची पाहणी केली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, जिल्ह्यातील कोरोना विषयीच्या उपाययोजना समाधानकारक आहेत. कोविड-१९ ची चाचणी करण्यासाठी ज्या किट्स आल्या होत्या. त्यातील काही किट्स सदोष असल्याचे स्पष्ट झाले. त्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. या सदोष किट्सचा वापरही संपूर्ण राज्यात थांबविण्यात आला आहे. नव्याने पुन्हा किट्स मागविल्या आहेत. जालना येथे वैद्यकीय महाविद्यालय होण्यासाठी आ. कैलास गोरंट्याल यांनी पाठपुरावा केला. त्यानुसार हा दौरा आयोजित केला होता, असेही वैद्यकीय मंत्री देशमुख यांनी सांगितले.
नाट्यगृहांचे रूपडे बदलणारराज्यातील सर्व नाट्यगृहांचे रूपडे आगामी काळात बदलणार आहे. त्यासाठी विशेष उपक्रम हाती घेतला असून, सर्वेक्षण करून नाट्यगृहांच्या दुरूस्तीची कामे केली जातील. नागरिकांना सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेता यावा, यासाठी ही नवीन योजना होती घेतल्याचेही सांस्कृतिक विभागाचे मंत्री असलेले अमित देशमुख यांनी यावेळी सांगितले.