लोकमत न्यूज नेटवर्कजालना : लोकमतच्या वतीने आयोजित संस्काराचे मोती उपक्रमातून विमान प्रवासाची पहिल्यांदाच संधी मिळाली. यामुळे देशाची राजधारी दिल्ली पाहण्याचा जो योग आला, त्यामुळे आपण समाधानी आहोत, त्यातच उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आम्हा मुलांना जे मोलाचे मार्गदर्शन केले, ते आजही स्मरणात असून, त्यानुसार पुढील वाटचाल करणार असल्याची भावूक प्रतिक्रिया ऋषिकेश विपुल भागवत या विद्यार्थ्याने व्यक्त केली.गेल्यावर्षी संस्काराचे मोती उपक्रमातून दिल्लीला विमानाने जाण्याची संधी मिळाली होती, यंदाही संस्काराचे मोती हा उपक्रम लोकमतने सुरू केल्याने मोठा आनंद होत असल्याचे ऋषिकेश म्हणाला. संस्काराचे मोती या सदरातून विद्यार्थ्यांसाठी जो खास उपक्रम सुरू केला आहे, त्यामुळे शालेय अभ्यासा सोबतच जगातील भोवतालचे परिपूर्ण ज्ञान मिळण्यास मोठी मदत होते. दिल्लीला आणि ते देखील विमानाने जाण्यासाठीच्या राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये माझा सहभाग राहिल्याने मनस्वी आनंद झाला होता.घरात सकाळी लोकमत आल्यावर तो प्रथम मी उचलून घेऊन संस्काराचे मोती हे पान उघडून वाचन करत असे. यंदाही तोच कित्ता आपण गिरवणार असल्याचे ऋषिकेशने सांगितले. दिल्लीत गेल्यावर तेथील लोकसभेची भव्य इमारत, इंडिया गेट, राष्ट्रपती भवन, सरंक्षण मंत्रालय आदी ठिकाणांना आम्ही भेटी दिल्या. उपराष्ट्रपी व्यंकय्या नायडू यांनी आम्हा विद्यार्थ्यांना जे मार्गदर्शन केले, ते अमूल्य होते. विद्यार्थ्यांनी घरात तसेच बाहेरच्या जगात वावरताना नेमके कसे वागले पाहिजे याचा मार्मिक पाठ त्यांनी शिकविला. त्यात आई-वडिल तसेच घरातील अन्य थोरांचा सन्मान करणे, संस्कारक्षम राहण्यासाठी नियमिती अभ्यासासह अन्य पुस्तकांचे वाचन करणे आदी संदर्भात मार्गदर्शन केले, ते आजही तेवढेच मनात घर करून असल्याचे पोदार इंग्रजी शाळेतील इयत्ता आठवित शिक्षण घेत असलेल्या ऋषिकेशने सांगितले.विमानात बसताना कुतूहल होते, मात्र नंतर आपण एवढ्या लहान वयात विमानात बसलो ते केवळ लोकमतच्या उपक्रमामुळे याची जाणीवही होती.आम्ही ज्यावेळी मुंबई ते दिल्ली आणि पुन्हा दिल्ली ते मुंबई असा विमान प्रवास केल्याचे मोठे अप्रूप आजही कायम आहे. त्यामुळे मुलांनी संस्काराचे मोती या उपक्रमात सहभागी होण्याचे विशेष आवाहनही ऋषिकेशने त्या अन्य विद्यार्थी मित्रांना या निमित्ताने केले.
मुंबई ते दिल्ली विमान प्रवासाच्या आठवणींनी आजही मिळतो आनंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 12:53 AM