जालना : अंगणवाडी सेविकांना कामकाजासाठी देण्यात आलेले मोबाईल निकृष्ट दर्जाचे असल्याचे सांगत जिल्ह्यातील ३०० वर अंगणवाडी सेविकांनी प्रशासनाकडे मोबाईल परत केले आहेत. त्यामुळे सध्या अनेकींचे काम ऑफलाईन सुरू असून, अहवाल भरण्याचा ताणही वाढला आहे.
जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांना शासनाकडून मोबाईल देण्यात आले आहेत. त्याद्वारे पोषण आहार वाटप, बालकांची तपासणी, लसीकरण यासह इतर विविध कामांची माहिती दैनंदिन ऑनलाइन भरण्याचे सूचित करण्यात आले होते. परंतु, विविध तांत्रिक कारणांनी बंद पडणारे मोबाईल आणि कामकाजाची भाषा मराठी करावी, या मागणीसाठी अंगणवाडी सेविकांनी शासकीय मोबाईल परत दिले होते.
म्हणून केला मोबाईल परत
अंगणवाडी सेविकांना देण्यात आलेल्या अनेक मोबाईलची मेमरी आणि रॅम कमी असल्याच्या तक्रारी होत्या.
शिवाय अनेक मोबाईलमध्ये असलेले ॲपही सुरळीत चालत नव्हते. त्यामुळे मोबाईल सतत हँग होत आहे.
शिवाय माहिती भरताना इंग्रजी भाषेची अडचण येत होती. मराठी भाषा कामकाजासाठी वापरण्याची मागणी आहे.
कामांचा व्याप
अंगणवाडी सेविकांना यापूर्वीच विविध प्रशासकीय कामे करावी लागत होती. त्या कामांचा अहवाल ऑनलाइन द्यावा लागत होता. त्यात आता पोषण माह सुरू आहे. त्याचे विविध कार्यक्रम घेऊन फोटो अपलोड करावे लागतात. थीमद्वारे बालक आणि महिलांसाठी हे कार्यक्रम राबविले जात आहेत. या कामाचाही व्याप वाढला असून, अनेकवेळा खासगी मोबाईल वापरून माहिती ऑनलाइन भरण्याची वेळ संबंधितांवर आली आहे.
असून अडचण नसून खोळंबा
प्रशासनाकडून देण्यात आलेल्या मोबाईलमध्ये एक ना अनेक अडचणी येत होत्या. ऑनलाइन काम करताना माबाईल व्यवस्थित चालत नव्हते. त्यामुळे अंगणवाडी सेविकांनी प्रशासनाला मोबाईल परत दिले आहेत. सध्या आम्ही ऑफलाईन काम करीत असून, त्याचा ताण वाढला आहे. अंगणवाडी सेविकांच्या मागण्या शासनाने मान्य कराव्यात.
- सुनंदा पवार
महिला, बालकांच्या आरोग्यासाठी अंगणवाडी सेविकांचे कामकाज महत्त्वाचे आहे. दैनंदिन अहवाल ऑनलाइन करण्यासाठी चांगले मोबाईल आवश्यक आहेत. त्यामुळे शासनाने चांगले मोबाईल देण्यासह त्याची भाषा मराठी करावी. यासह अंगणवाडी सेविकांच्या इतर मागण्या मान्य कराव्यात.
- इरफाना आतार
जिल्ह्यातील काही अंगणवाडी सेविकांनी मोबाईल परत केले होते. संघटनेच्या स्तरावर शासनाशी चर्चा झाल्याचे समजते. आम्ही शासकीय परिपत्रकानुसार जमा केलेले मोबाईल अंगणवाडी सेविकांनी परत न्यावेत, असे सूचविले आहे. अंगणवाडी सेविकांच्या मागण्या आम्हीही शासनाकडे पाठविल्या आहेत. सध्या जिल्ह्यात पोषण माहचे काम सुरू आहे.
- एस. डी. लोंढे, जिल्हा महिला बालकल्याण अधिकारी, जालना