लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील मोती तलावात गणेश विसर्जन करताना रविवारी तीन युवकांचा पाण्यात बुडून मूत्यू झाला. दरम्यान, या प्रकरणी सोमवारी दोन मयत युवकांच्या नातेवाईकांनी मृतदेह थेट नगर पालिकेमध्ये आणल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता. दरम्यान मयताच्या एका नातेवाईकास पालिकेने नोकरी द्यावी आणि आर्थिक मदत मिळावी अशी मागणी करत दोन तास ठिय्या आंदोलन करण्यात आले.प्रारंभी सकाळी मृतांच्या नातेवाईकांनी जिल्हा सामान्य रूग्णालयात मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. नंतर हे मृतदेह शववाहिनीतून थेट जालना पालिकेत आणण्यात आले. तेथे शंभरपेक्षा अधिक नागरिकांचा संतप्त जमाव एकत्रित आला होता. यावेळी उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी संतप्त नातेवाईकांना समजावण्याचा प्रयत्न केला. मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांच्यावरही जमावाने प्रश्नांची सरबत्ती केली. एकूणच या गोंधळाच्या वातावरणामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असल्याने शांतता राहिली.या गंभीर प्रकरणात पालिकेने मोती तलावाजवळ पाहिजे तेवढी दक्षता न घेतल्याचाही आरोप यावेळी संतप्त जमावाने केला. संतप्त जमावाला शांत करताना उपनगराध्यक्ष राजेश राऊत आणि मुख्याधिकारी खांडेकर यांनी मृतांच्या नातेवाईकांना मदत अथवा नोकरीत सामावून घ्यावयाचे झाल्यास सर्वसाधारण सभेमध्ये हा विषय ठेवून त्याला मान्यता घ्यावी लागते ही बाब समजावून घ्यावी असे सांगत लेखी पत्र दोन्ही मृतांच्या नातेवाईकांना दिले. हे पत्र मिळाल्यानंतर दोन तास चाललेले हे ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलन मागे घेतल्यानंतर सोमवारी दुपारी निहाल चौधरी आणि शेखर भदनेकर यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान रविवारी रात्री राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आ. राजेश टोपे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर यांनी जिल्हा सामान्य रूग्णालयास भेट देऊन नातेवाईकांचे सात्वंन करून खोतकर यांनी मुख्यमंत्री निधीतून एक लाख रूपयांची मदत देण्यासाठीचे पत्रही मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी भेट दिली होती.गोरंट्याल यांच्याकडून सांत्वनगणेश विसर्जनादरम्यान झालेली दुर्घटना निश्चितच दुर्दैवी आहे. घटना घडल्यानंतर आपण स्वत: मृतांच्या नातेवाईकांची भेट घेऊन आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिल्याचे माजी आ.कैलास गोरंट्याल यांनी दिले.मुख्याधिका-यांचे लेखी आश्वासननातेवाईकांनी न.प.च्या मुख्याधिका-यांची भेट घेऊन कुटुंबातील एका व्यक्तीस नोकरीतसामावून घेऊन अर्थिक मदत देण्याचे लेखी आश्वासन माघितले. परंतु, मुख्याधिकाºयांनी लेखी आश्वासन देण्यास नकार दिल्याने मोठा गोंधळ उडाला. त्यानंतर उपनगराध्यक्ष राजेश राऊत, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर, माजी नगराध्यक्ष बबलू चौधरी, विष्णू पाचफुले, यांनी मध्यस्थी करून मयतच्या कुटुंबियांना न.प. च्या कॉम्पेलसमधील एक दुकान व मदत देण्याचे लेखी आश्वसन दिले.या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी उच्चपातळीवर आपण चर्चा करणार असल्याचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी संतप्त जमावाला सांगितले.
नातेवाईकांच्या संतापाचा कडेलोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 1:06 AM