लोकमत न्यूज नेटवर्कटेंभुर्णी : टेंभुर्णी पोलीस स्टेशन हद्दीतून दोन आयशरमध्ये भरून परभणीकडे चालवलेली ३३ गुरे टेंभुर्णी पोलिसांनी पकडलीे. या धडक मोहिमेत पोलिसांनी आयशर व गुरे मिळून एकूण १६ लाख ६० हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई मंगळवारी रात्री झाली.मंगळवारी रात्री टेंभुर्णी पोलीस गस्त घालीत असताना जाफराबाद - देऊळगावराजा रोडवर गणेशपूर फाट्याजवळ त्यांना दोन आयशर जाताना दिसले. त्यांना थांबवून चौकशी केली असता त्यातील एका गाडीत १६ तर दुसऱ्या गाडीत १७ बैल असल्याचे कळले. जनावरांबाबत आरोपींनी कुठलेही सबळ पुरावे न दाखविल्याने पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त केला. ही जनावरे सिल्लोड तालुक्यातील शिवना येथून परभणीकडे नेली जात होती. दरम्यान ही जनावरे चोरून चालविली होती की विक्रीसाठी चालविली होती, याबाबत माहिती कळू शकली नाही.या प्रकरणी बीट जमादार पंडित गवळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवना येथील सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोकॉ. त्र्यंबक सातपुते, पोकॉ. बळीराम तळपे, पोकॉ. प्रदीप धोंडगे यांच्या पथकाने केली. तपास पोकॉ. राजेंद्र सानप करीत आहेत.पोलीस स्टेशनमध्येच चारापाणीदरम्यान, बुधवारी सकाळी या सर्व जनावरांना टेंभुर्णी पोलीस स्टेशनमध्येच चारापाणी करण्यात आले. ही सर्व जनावरे उंचपुरी व बलाढ्य असल्याने त्यातील काही वन गुरे असल्याचा अंदाज नागरिक लावत होते.यातील सर्व जनावरांच्या शरीरावर शाईने नंबर नोंदविण्यात आले आहेत. दरम्यान, ही जनावरे पाहण्यासाठी बुधवारी सकाळी ग्रामस्थांनी पोलीस स्टेशनसमोर गर्दी केली होती.यातील काही जनावरे तूर्त अकोलादेव येथील गटशेती संघाकडे देखभालीसाठी दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
दोन ट्रकमधून जाणारी गुरे पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 1:20 AM