पवन पवार/वडीगोद्री(जालना): सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गुरुवारी(3 एप्रिल) दुपारी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटीत भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हेदेखील उपस्थित होते. संतोष देशमुख यांची हत्या आणि जरांगे पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आल्याचे दमानिया यांनी सांगितले.
या भेटीबाबत अंजली दमानिया म्हणाल्या की, दोन-तीन दिवसांपूर्वी एका सभेमध्ये मनोजदादांना चक्कर आली होती. त्यावेळी मी ठरवले होते की, आपण भेट घेऊन दादांच्या तब्येतीची विचारपूस करावी. आम्ही आतापर्यंत भेटलो नव्हतो, फक्त फोनवर चर्चा झाली होती, म्हणूनच मी आज खास भेटायला आले. चांगल्या माणसांना भेटायला कधीच काही प्रॉब्लेम नसतो.
संतोष देशमुख खून प्रकरणाबाबत काही चर्चा झाली का?यावर बोलताना दमानिया म्हणाल्या, याच्या पुढची दिशा कशी द्यायची, यावर चर्चा झाली. मला त्या चार्टशीटमध्ये सगळ्या गोष्टी अर्धवट वाटत आहेत. आरोपी सुदर्शन घुलेचे स्टेटमेंट जेव्हा माध्यमांसमोर आले, मला ते अर्धवट वाटले. कारण त्यात खुनानंतर पुढे काय झाले, तो कुठे गेला, कोणाच्या मदतीने बाहेर राहिला, तेव्हा कराडशी त्याचे बोलणे झाले का, याबाबत चकार शब्द सुद्धा स्टेटमेंट मध्ये लिहिलेला नाही.
पोलिसांनी असे अर्धवट स्टेटमेंट का घेतले? मी मागे म्हटले होते की, दहा लोक आहेत, त्यांना सहआरोपी करणे गरजेचे आहे. व्हिडिओत राजेश पाटील दिसले, प्रशांत महाजन दिसले. मात्र, कोणालाच शिवलिंग मोराळे, बालाजी तांदळे, डॉक्टर वायबसे..यांना सह आरोपी केले नाही. यांना जर सहआरोपी केले, तर याचे धागे दोरे थेट धनंजय मुंडेंपर्यंत जातात. त्यामुळेच हे मुद्दाम केले गेले नाही, असा आरोप त्यांनी केला.
तब्येतीची विचारपूस करण्यासाठी ताई आल्याया भेटीबाबत मनोज जरांगे पाटील यांना विचारले असता, ते म्हणाले की, बीडला शिक्षकाच्या कार्यक्रमामध्ये मला चक्कर आली होती. त्यानिमित्ताने अंजली ताई भेटायला आल्या. ताईंच्या कामाचा आवाका मोठा आहे, तरीपण त्यांनी भेटायला यायचे ठरवले, दुसरे काही नव्हते, असे जरांगे पाटील यांनी म्हटले.