लोकमत न्यूज नेटवर्कजालना : देशाचं स्वातंत्र्य, स्त्रीचं शील, पुरूषाचा स्वाभिमान आणि मानवाची प्रतिष्ठा या चार खांबांवर अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य उभे आहे. आज असभ्यतेचे तांडव सर्वत्र पसरले आहे. यामुळे अण्णा भाऊ साठे यांची आज खरी गरज होती. असे मत महात्मा जोतीराव फुले चरित्र साधने प्रकाशन समिती सदस्य सचिव डॉ. श्यामा घोणसे यांनी व्यक्त केले आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व जेईएस महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यामाने ‘अण्णा भाऊ साठे जीवन व कार्य’ या विषयावर शनिवारी एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन जेईएस महाविद्यालयात करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून घोणसे बोलत होत्या.स्वागतपर भाषणात डॉ. जवाहर काबरा यांनी जालन्याची भूक भागविण्याचे कार्य महाविद्यालयाने केले असल्याचे सांगितले. साहित्यिक डॉ. माधव गादेकर यांनी अण्णा भाऊ साठे आंतरराष्ट्रीय दर्जाचे लेखक आहेत. सामान्य, उपेक्षित, वंचित आदींचे जीवन अण्णांच्या साहित्यातून पहायला मिळते असे सांगितले. त्यांच्या साहित्यात स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मुल्य असून ती मानवाचे जीवन सुखकर करते, असेही त्यांनी सांगितले. बाबासाहेब वाघ यांनी श्यामा घोणसे यांचा परिचय करून दिला.
चार खांबांवर आधारित अण्णा भाऊ साठेंचे साहित्य आजही प्रेरणादायी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 12:12 AM