शहागड येथे अभिवादन
जालना : अंबड तालुक्यातील शहागड येथे संत नरहरी सोनार महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी ज्ञानेश्वर उदावंत, नारायण उदावंत, गणेश डहाळे, सुरेश माळवे, विशाल बेद्रे, राहुल शहाणे, सुरेश उदावंत, गौरव माळवे आदी उपस्थित होते.
आन्वा परिसरात चोरीचे प्रमाण वाढले
आन्वा : भोकरदन तालुक्यातील आन्वा परिसरात बैल चोरीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. सद्यस्थितीत पशुधनांचे भाव खूप वाढले आहेत. एक बैल जोडीची किंमत जवळपास एक लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे. शेतकरी मोठ्या हिमतीने त्याचे पालनपोषण करतो. मागील काही दिवसांपासून बैल चोरीचे प्रमाण वाढल्याने शेतकरी हैराण झाले आहे.
जालन्यात लोकअदालतीचे आयोजन
जालना : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय, जालना व सर्व तालुका न्यायालयांमध्ये प्रलंबित मोटार वाहन कायद्याअंतर्गत १० एप्रिल रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. यात नुकसानभरपाईची प्रकरणे, प्रलंबित दिवाणी व फौजदारी प्रकरणे, एन. आय. ॲक्टची प्रकरणे, बँकेची वसुली प्रकरणे आदी प्रकरणे निकाली काढण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांची ऑनलाईन फसवणूक
अंबड : शहरातील नवीन मोंढा येथील विद्यार्थी कार्तिक कैलास अग्रवाल यांनी एका वेबसाईटवरून पुस्तकांची मागणी केली होती. मात्र, त्यांना पुस्तके मिळाली नाहीत. त्यांनी फोनवरून संपर्क साधला असता त्यांना समोरील व्यक्तीने ऑनलाईन फसवणूक केल्याचे समजले. गुरुवारी दुपारी त्यांच्या बॅंक खात्यातून ५४ हजार २१० रुपये काढून घेतले. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
उस्वद नदीपात्रातून वाळूचा उपसा सुरू
तळणी : मंठा तालुक्यातील उस्वद येथील महादेव मंदिर परिसरातील नदीपात्रातून अवैध वाळू उपसा पुन्हा केला जात आहे. वाळू चोरी थांबविण्यासाठी ग्रामस्थांनी रस्त्यात चर खोदून रस्ता बंद केला होता. परंतु स्थानिक वाहनधारकांनी तो परत चालू केला. ही माहिती मिळताच पी. के. घुगे यांनी थेट नदीपात्र गाठले. परंतु, वाळूमाफियांना माहिती कळताच त्यांनी नदीपात्रातून वाहनांसह धूम ठोकली.
कटाळा - पांगरी रस्त्याची दुरवस्था
जालना : कटाळा ते पांगरी मार्गाची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. पूलही मोडकळीस आला आहे. सेवलीमार्गे विदर्भाला जोडणारा यदलापूर ते पांगरी हा रस्ता महत्त्वाचा आहे. या रस्त्यावर बरीच वर्दळ असते. बसच्या दररोज अनेक फेऱ्या या रस्त्याने असतात. परंतु, कटाळा - पांगरी मार्गावरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांची गैरसोय होत आहे. विशेषत: रात्रीच्या वेळी रस्त्यावर खड्डे चुकविताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटते.
हाणामारीप्रकरणी आठजणांविरूध्द गुन्हा
जालना : जुन्या वादातून जालना शहरातील जिंदल मार्केटसमोर दोन गटांत बुधवारी रात्री १०.१५ वाजण्याच्या सुमारास तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीत काहीजण जखमी झाले आहेत. काहींना जिल्हा सामान्य रुग्णालयात, तर काहींना खासगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. या घटनेमुळे या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणात आठजणांविरूद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.