जालना : जिल्हा परिषदेच्या तहकूब असलेल्या स्थायी समितीची सभा शुक्रवारी ऑनलाईन आयोजित केली होती. या सभेला सदस्य ऑनलाईन हजर होण्यापूर्वीच राष्ट्रगीत सुरू करून सभा संपल्याचे जाहीर केले. यामुळे संतापलेल्या पाच सदस्यांनी जि. प. अध्यक्षांच्या दालनात धाव घेत गोंधळ घातल्याची घटना घडली. यामुळे काही काळ जि. प.मध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
जालना जिल्हा परिषदेची महिन्याभरापूर्वी तहकूब झालेली स्थायी समितीची सभा शुक्रवारी ऑनलाईन होणार याची माहिती प्रशासनाने सदस्यांना दिली होती. परंतु अनेक सदस्य हे ग्रामीण भागातील असल्यामुळे नेटवर्कच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे पाच सदस्य जिल्हा परिषदेत आले होते. बैठक सभागृहातून ते सभेत ऑनलाईन सहभागी झाले. मोजकेच सदस्य असल्यामुळे ऑनलाईनच्याऐवजी ऑफलाईन सभा घ्यावी अशी मागणी सदस्यांनी केली. ही मागणी धुडकावत सर्व ठराव मान्य झाले असल्याचे सांगत राष्ट्रगीताला सुुरुवात केली. या प्रकारामुळे सदस्य अवधूत खडके, शालकीराम म्हस्के, जयमंगल जाधव आदींनी अध्यक्षांच्या दालनात धाव घेऊन जाब विचारला. यावेळी सदस्य आणि पदाधिकारी, अधिकाऱ्यांमध्ये वाद झाला. हा वाद दालनाबाहेरही ऐकू येत होता. त्यामुळे अध्यक्षांच्या दालनाबाहेर मोठ्या संख्येने कर्मचारी जमा झाले होते. या सभेतील विषयांना आमची मंजुरी नसल्याचे सांगून सभा रद्द करण्याची मागणीही सदस्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
पालकमंत्र्यांनी परस्पर केले १८ कोटींचे नियोजनजि. प.च्या बांधकाम विभागाच्या समितीचे नियोजन पालकमंत्री राजेश टोपे यांनी परस्पर केल्याचा आरोप भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी केला आहे. यात १८ कोटी रुपयांचे नियोजन असल्याचेही सदस्य अवधूत खडके यांनी सांगितले. त्यास जि. प. उपाध्यक्ष महेंद्र पवार यांनीही विरोध दर्शविला आहे. या परस्पर नियोजनाच्या कामाला स्थगिती द्यावी, अशी मागणीही सदस्यांनी केली. यावेळी अध्यक्ष उत्तम वानखेडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव केंद्रे यांची उपस्थिती होती.