जालना : पार्टटाइम जॉब देतो म्हणून टास्क देऊन शहरातील एका व्यापाऱ्याची ४२ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून आरोपींच्या बँक खात्यातील ६० लाख ७९ हजार रुपये गोठविले आहे. ही कारवाई बुधवारी करण्यात आली आहे.
जालना येथील एका व्यापाऱ्याला व्हॉट्सॲपवर पार्टटाइम जॉबसाठी मेसेज आला होता. त्यांनी सदर क्रमांकावर फोन केला. समोरील व्यक्तीने दिल्लीतील एका कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. पार्टटाइम जॉबद्वारे पैसे कमावण्याची ऑफर देऊन फिर्यादीला यूट्यूब चॅनल लाईक करण्याचा टास्क देऊन पैसे गुंतवणूक करण्यास सांगितले. फिर्यादीला लिंकद्वारे टेलिग्रामवरील ग्रुप जाॅइन करण्यास देखील सांगण्यात आले. काही रक्कम गुंतविल्यानंतर फिर्यादीला पैसे मिळू लागले. आरोपीने विविध कारणे सांगून फिर्यादीकडून टप्प्याटप्प्याने जवळपास ४२ लाख ३७ हजार १०८ रुपये गुंतवणूक करण्यास सांगितले.
सदर गुंतवणूक केलेले पैसे परत मागितले असता, संबंधित व्यक्तीने फिर्यादीला टेलिग्रामवरील ग्रुपमधून काढून टाकले. याची तक्रार सायबर पोलिसांकडे करण्यात आली. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेला मोबाइल, बँक खात्यांचा तांत्रिक पद्धतीने तपास करून फिर्यादीने विविध बँकांच्या खात्यात ट्रान्सफर केल्याचे दिसून आले. पोलिसांनी ते खाते गोठविले आहे. जवळपास ६० लाख ६९ हजार ५१५ रुपये गोठविण्यात पोलिसांना यश आले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. शालिनी नाईक, सपोनि. सुरेश कासुळे, सपोनि. वडते, सफौ पाटोळे, पो.ह. राठोड, पोना. मांटे, पोशि घुसिंगे, पोशि. भवर, पोशि. मुरकुटे, मपोह पालवे, मपोशि. दुनगहू यांनी केली आहे.