रोहयोची कामे ठप्प
जालना : तालुक्यात रोजगार हमी योजनेची कामे ठप्प असल्याने मजूर वर्ग अडचणीत आहे. रब्बीचा हंगाम संपला असून, मजूर मंडळी आता कामाच्या शोधात विविध भागांत फिरत आहेत. रोहयोची कामे सुरू झाल्यास मजुरांची गैरसोय दूर होईल. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
वाटूर फाटा येथे पोलिसांकडून पाणपोई सुरू
वाटूर फाटा : परतूर तालुक्यातील वाटूर फाटा येथे वाटूर पोलीस चौकीतील पोलीस कर्मचाऱ्यांनी पाणपोई सुरू केली आहे. उन्हाला सुरू असल्याने नागरिकांना याचा फायदा होत आहे. यावेळी पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे, पोलीस निरीक्षक रवींद्र ठाकरे, विलास कातकडे, रवींद्र अण्णा सरदार, दांडगे, गणेश शिंदे जगदीश पडूळकर आदींची उपस्थिती होती.
गोंदी परिसरात पोलिसांची गस्त
अंबड: तालुक्यातील गोंदी बसस्थानक तसेच बाजारगल्लीत गोंदी पोलिसांनी गस्त घातली आहे. गावात शुक्रवारी विनाकारण फिरणाऱ्यांना समजही देण्यात आली आहे. ग्रामस्थांनी विनाकारण फिरू नये, मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिगंचे पालन करावे, असे आवाहन पोनि. शीतलकुमार बल्लाळ यांनी केले आहे.
जिल्ह्याच्या हद्दीवर २५ चेकपोस्ट
जालना : कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता, शासनाच्या वतीने पुन्हा एकदा आंतरजिल्हा प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. जालना पोलिसांनी जिल्ह्याची हद्द सीलबंद करण्यासाठी शुक्रवारी तब्बल २५ ठिकाणी चेकपोस्ट स्थापन करण्यात आले आहेत. यामुळे नागरिकांना इतर जिल्ह्यात जाण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची वेळ येणार आहे.
भादली येथे लसीकरणासाठी गर्दी
घनसावंगी: घनसावंगी तालुक्यातील भादली येथे कोरोना लसीकरण मोहिमेस सुरुवात करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी ११० जणांचे लसीकरण करण्यात आले. लसीकरणासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी वैद्यकीय अधिकारी एस. पाठक, नाटेकर यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती. कोरोना लस ही पूर्णपणे सुरक्षित असून, जास्त नागरिकांनी लसीकरण करावे, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी एस. पाठक यांनी केले आहे.
सोनक पिंपळगाव लसीकरणास प्रतिसाद
अंबड : अंबड तालुक्यातील सोनक पिंपळगाव येथे कोविड-१९ प्रतिबंधात्मक लसीकरणाचा शुभारंभ शुक्रवारी करण्यात आला. पहिल्याच दिवशी ५१ जणांनी लस घेतली. यावेळी सरपंच शंकर धुमाळ, ग्रामसेवक राहुल गवई, शाळेचे मुख्याध्यापक एम.एस. रंधे, सहशिक्षक एन. एस. बर्वे, एस. एस. शिंदे, जी. एस. कापसे, तलाठी ज्ञानेश्वर चौरे, छाया काळे आदींची उपस्थिती होती.
दुसऱ्या कोविड केअर सेंटरची उभारणी
अंबड : अंबड तालुक्यातही रुग्णसंख्या वाढत आहे. यामुळे येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरची क्षमता पूर्ण झाल्याने आता घनसावंगी रस्त्यावरील वसतिगृहांमध्ये दुसरे सेंटर कार्यन्वित करण्यात आले आहे. अंबड शहरासह तालुक्यात गेल्या महिनाभरापासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
विझोरा येथे ग्रा.पं. तर्फे स्वच्छता मोहीम
जालना : भोकरदन तालुक्यातील विझोरा येथे ग्रामपंचायतीच्या वतीने संपूर्ण गावात धूरफवारणी करण्यात आली. तसेच स्वच्छता मोहीमदेखील राबविण्यात आली आहे. यावेळी सरपंच आशाबाई सपकाळ, उपसरपंच शोभाबाई गावंडे, माणिक निंबाळकर, पोलीस पाटील ज्योती समाधान रदाळ, ग्रामसेवक एस. एस. वाघ, मुख्याध्यापक एम. आर. मुरकुटे, ग्रामपंचायत लिपिक के. एस. तांगडे, कर्मचारी एस. यू. सपकाळ, तलाठी काळवाघे आदींची उपस्थिती होती.
सोमनाथ जळगाव येथे स्वच्छता अभियान
जालना : जालना तालुक्यातील सोमनाथ जळगाव येथे स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत गावात ठिकठिकाणी साफसफाई केली जात आहे. तसेच गावात स्वच्छतेबाबत जनजागृती केली जात आहे. यावेळी सरपंच दांडाईत, उपसरपंच सोनाजी भुतेकर, गजानन ढोले, ज्ञानेश्वर आर्देड, विलास हनवते आदींची उपस्थिती होती. नागरिकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करून घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.