जालना : करमाड (जि.औरंगाबाद) पोलीस ठाण्यात कार्यरत सहायक पोलीस निरीक्षकासह एका कॉन्स्टेबलला जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी पंचवीस हजारांची लाच स्वीकारताना अटक केली. गोरखनाथ शेळके व शकील शेख, अशी अटक केलेल्या पोलीस कर्मचा-यांची नावे आहेत.या प्रकरणातील तक्रारदाराचे वाळू वाहतुकीचे वाहन सहायक निरीक्षक गोरखनाथ शेकळे याने पकडून करमाड ठाण्यात लावले होते. तसेच वाहन चालकाविरुद्ध करमाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला होता. तक्रारदाराने शेळके व कॉन्स्टेबल शेख यांची भेट घेऊन वाहन सोडविण्याची विनंती केली. शेळके याने वाहन सोडविण्यासह या पुढे वाळू वाहतूक करू देण्यासाठी शेख यांच्याकडे २५ हजारांची लाच देण्यास सांगितले. मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिका-यांनी करमाड ठाण्यात पडताळणी केली असता, संबंधितांनी २५ हजारांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. सोमवारी करमाड पोलीस ठाण्यात सापळा लावून एसीबीने शकील शेख यास तक्रारदाराकडून २५ हजारांची लाच स्वीकारताना अटक केली. या प्रकरणी शेळके व शेख यांच्याविरुद्ध करमाड ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी, अपर अधीक्षक एस. आर. जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली जालना येथील उपअधीक्षक राजेंद्र निकाळजे, पोलीस निरीक्षक आदिनाथ काशीद, विनोद चव्हाण, संतोष धायडे, संजय उदगीरकर, गंभीर पाटील, महेंद्र सोनवणे, रमेश चव्हाण यांनी ही कारवाई केली.----------------