जमावबंदी आयुक्त, पुणे यांनी ५ ऑगस्ट रोजी ई-पीक पाहणी प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी कार्यपद्धती निश्चित केली आहे. त्या अंतर्गत दिलेल्या वेळापत्रकानुसार १ ते १४ ऑगस्ट या कालावधीत प्रचार, प्रसिद्धी, प्रशिक्षण व प्रबोधन, तर १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत शेतकरी खातेदारांची ॲपवर प्रत्यक्ष नोंदणी व खरीप हंगामातील पिकांची माहिती फोटोसह अपलोड करावयाची आहे.
ई-पीक पाहणीचे अनेक फायदे असून, प्रामुख्याने प्रकल्पातील माहिती ही शेतकऱ्यांना देय असणाऱ्या कोणत्याही योजनेचा थेट लाभ देण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. जसे ठिंबक सिंचन, तुषार सिंचन योजनांचे लाभ खातेदारांना अचूकरीत्या देणे सहज शक्य होणार आहे. त्याचप्रमाणे खातेदारनिहाय पीक पाहणीमुळे खातेदारनिहाय पीककर्ज अथवा पीकविमा योजना भरणे किंवा पीक नुकसानभरपाई अदा करणे शक्य होणार आहे. तसेच पीकनिहाय लागवडीचे क्षेत्र व उत्पन्नाचा अचूक अंदाज काढणे शक्य होणार आहे. यासोबतच या ॲपद्वारे खातेनिहाय व पीकनिहाय क्षेत्राची यादी उपलब्ध होऊ शकणार आहे. १५ ऑगस्ट रोजीच्या ग्रासभेमध्ये त्या-त्या गावचे तलाठी आणि कृषी सहायक हे उपस्थित राहून या कार्यक्रमाविषयी मार्गदर्शन करणार आहेत. त्या त्या गावातील शेतकऱ्यांची अधिकाधिक नोंदणी करून ई-पीक पाहणी कार्यक्रम यशस्वी करण्याच्या सूचना जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीच्या बैठकीत समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिल्या आहेत.