लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शेतकऱ्यांना पीकविमा भरण्यासाठी शासनाने ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली असून या कालावधीत जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँका, जिल्हा मध्यवर्ती बँका व आपले सरकार केंद्रांनी जिल्ह्यातील अधिकाधिक शेतक-यांचा पीकविमा भरुन घेण्याचे निर्देश पशुसंवर्धन, दुग्धविकास, मस्त्यव्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बुधवारी पीकविमा, कर्जमाफी व बोंडअळी अनुदान वाटपासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थित अधिका-यांना मार्गदर्शन करताना राज्यमंत्री खोतकर बोलत होते.यावेळी जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, माजी आमदार अरविंद चव्हाण, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, उप विभागीय अधिकारी केशव नेटके, कृषी अधीक्षक दशरथ तांभाळे, जिल्हा उपनिबंधक एन.व्ही. आघाव, अग्रणी बँक व्यवस्थापक ईलमकर, तहसीलदार बिपीन पाटील, यांच्यासह जिल्ह्यातील विविध बँकांचे व्यवस्थापक उपस्थित होते. राज्यमंत्री खोतकर म्हणाले की, पीकविमा भरण्यासाठी शासनाने मुदतवाढ दिली आहे. या वेळेमध्ये जिल्ह्यातील प्रत्येक शेतकºयाकडून पीकविमा भरुन घेण्यात यावा. राष्ट्रीयकृत बँका, जिल्हा मध्यवर्ती बँक तसेच आपले सरकार केंद्राच्या माध्यमातुन अधिका-यांनी रात्री उशिरापर्यंत थांबून हे काम करावे असे सांगितले.गतवर्षात बोंडअळीच्या प्रादुर्भावाने बाधित झालेल्या शेतक-यांना वाटप करण्यात येणाºया अनुदानाचा आढावा घेत यावर्षी बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी कृषी विभागाने आवश्यक त्या उपाययोजना करण्याबरोबरच गावोगावी शेतक-यांना बोंडअळीच्या प्रादुर्भावापासून वाचण्यासाठी आवश्यक असलेल्या मार्गदर्शक सूचनांचा प्रचार व प्रसार करण्याचे निर्देशही राज्यमंत्री खोतकर यांनी यावेळी दिले.जिल्ह्यात ६३४ आपले सरकार केंद्र उपलब्ध आहेत. या केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक शेतक-याचा पीकविमा भरुन घेण्यात येत आहे. परंतु आॅनलाईन पीकविमा भरुन घेण्यासाठी असलेल्या संकेतस्थळामध्ये तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे हे काम संथ गतीने होत असल्याची माहिती यावेळी राज्यमंत्र्यांना देण्यात आली. हा बिघाड कशामुळे होत आहे, याची कारणे शोधण्याची गरज खोतकरांनी वर्तविली.जालना : जिल्हाधिका-यांचे निर्देशपीकविमा भरुन घेण्यासाठी सातत्याने बँकेसह संबंधित अधिका-याच्या बैठका घेऊन त्यांना निर्देश देण्यात येत आहेत. पीकविमा भरुन घेण्याच्या कामात गती यावी जिल्हाधिकारी कार्यालयात हायस्पीड इंटरनेट सुविधेसह संपूर्ण सेटअप उपलब्ध करुन देण्याची तयारी दर्शवत बँकांनी त्यांच्या कर्मचा-याच्या मदतीने शेतक-यांचा पीकविमा भरुन घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी बिनवडे यांनी यावेळी उपस्थित अधिका-यांना दिले. तसेच या सर्व्हर डाऊन होण्यामागे नेमके कोणते कारण आहे, याचा शोध वरिष्ठ पातळीवर घेण्यात असल्याचे सांगण्यात आले. एकाच वेळी अनेक जण ही वेबसाईट हाताळत असल्यानेही तांत्रिक दोष येत असल्याचे दिसून आले.
मुदतवाढीचा लाभ घेण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 12:56 AM