परतूर : शहरासह तालुक्यातील कायदा-सुव्यवस्थेचा भार असलेल्या परतूर पोलीस ठाण्याचे रुपडे रंगरंगोटीमुळे बदलू लागले आहे. रंगरंगोटीशिवाय ठाण्यांतर्गत विविध कक्षांमध्येही कामे केली जात आहेत.
परतूर पोलीस ठाण्याच काही वर्षांपूर्वी निर्मिती करण्यात आली आहे. आधुनिक पद्धतीने बांधकाम केलेल्या या ठाण्याच्या इमारतीला सध्या रंगरंगोटी केली जात आहे. शिवाय ठाण्यांतर्गत विविध कक्षात बदल करण्यात येत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने ही रंगरंगोटी सुरू आहे. ठाण्याला पिवळा रंग दिला जात असून, मध्ये पांढरे पट्टे मारले जात आहेत. ठाणे अमलदार, संगणक कक्ष व ठाणे प्रमुखांचे कक्ष यामध्ये बदल करण्यात येत आहेत. यापूर्वी ठाणे प्रमुखांचे कक्ष एका कोपऱ्यात असल्याने ठाण्यातील हालचालींवर लक्ष ठेवणे अवघड होत होते. आता हा कक्ष दर्शनी भागात तयार करण्यात आला आहे. एकूणच या रंगरंगोटी व डागडुजीतून या पोलीस ठाण्याचे रुपडे बदलू लागले आहे.
चौकट.
पोलिसांची घरेही बांधा
परतूर पोलीस ठाणे पुन्हा एकदा चकाचक होऊ लागले आहे. मात्र, पोलीस वसाहतीतील एकही घर पोलिसंना राहण्यायोग्य नाही. पावसाळ्यात गळती, चिखलाचा सामना करावा लागतो. शौचालयाची झालेली दुरवस्था वेगळीच आहे. त्यामुळे पोलीस कर्मचारी कुटुंबासाठी नवीन घरे बांधून द्यावीत, अशी मागणीही जोर धरत आहे.