जालना - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फक्त आकड्यांची घोषणा करतात, ते खोटे बोलत आहेत, असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. सरकारने 1 लाख 20 हजार विहिरी बांधल्याचा सरकारचा दावा खोटा असल्याचेही राज म्हणाले. तसेच मराठा समाजाच्या आरक्षणावरुनही त्यांनी सरकारला लक्ष्य केले. मराठा समाजाला नोकरीत 16 टक्के आरक्षण मिळेल याची खात्री काय? असा प्रश्न उपस्थित करत मराठा आरक्षणाबाबत कोणताच राजकीय पक्ष खरे सांगत नसल्याचेही ते म्हणाले.
राज ठाकरे सध्या मराठवाडा दौऱ्यावर असून त्यांनी आज जालन्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी राज यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. गुजरातचे मुख्यमंत्री असताना हा माणूस जसा होता, तसा आता राहिला नाही. पंतप्रधान होताच मोदी पूर्णपणे बदलले आहेत. त्यामुळेच त्यांच्याविषयीची माझी भूमिकाही बदलल्याचे राज ठाकरेंने म्हटले. तसेच सरकार तरुणांना मूर्ख बनवत आहे. मराठा समाजाला नोकरीत 16 टक्के आरक्षण मिळेलच याची शाश्वती काय असा प्रश्नही राज यांनी उपस्थित केले. मराठा आरक्षणावरुन सर्वच राजकीय पक्ष टोलवाटोलवी करत असल्याचेही राज यांनी म्हटले.