संजय देशमुख
जालना : राज्यात भाजपा आणि शिवसेनेची युती झाली असली तरी, जालना लोकसभा मतदार संघाचे मैदान आपण सोडलेले नाही, अशी भूमिका राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी घेतली आहे. त्यामुळे येथे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे विरूद्ध शिवसेनेचे खोतकर अशी लढत रंगण्याची चिन्हे आहेत.
दोन दिवसांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मुंबईला जाणार असल्याचे खोतकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले. युतीसंदर्भात निर्णय घेण्याचे सर्व अधिकार हे उद्धव ठाकरेंना असल्याने आम्ही त्याचे स्वागत करतो, असेही सांगायला ते विसरले नाहीत. वर्षभरापासून खोतकर आणि दानवे यांच्यातून विस्तवही जात नाही. जिल्ह्यात भाजपा-सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी दरी आहे. जिल्हा परिषदेत भाजपाचे सर्वात जास्त २२ सदस्य असताना शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वाने राष्ट्रवादी काँग्रेसशी घरोबा केला आणि जिल्हा परिषदेत खोतकर यांचे चुलत बंधू अनिरूध्द खोतकर यांना अध्यक्ष केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश टोपे यांच्याकडे उपाध्यक्षपद दिले. जालना लोकसभा मतदार संघात जालना, बदनापूर- भोकरदन तसेच सिल्लोड, पैठण, औरंगाबाद शहराचा काही भाग आणि फुलंब्री हे मतदारसंघ येतात. यात शिवसेनेचे दोन, तर भाजपाचे चार आमदार आहेत.