जालना : जालना विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत आजवर शिंदेसेनेचे उपनेते माजी मंत्री आ. अर्जुन खोतकर आणि माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्यात पाचवेळा लढत झाली आहे. यंदा झालेल्या पाचव्या लढतीत अर्जुन खोतकर यांनी बाजी मारली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बंडखोरीचा फटका काँग्रेसचे उमेदवार गोरंट्याल यांना बसला आहे.
जिल्ह्यातील राजकीय पटलावर जालना शहर केंद्रस्थानी राहते. त्यात निवडणूक कोणतीही असो अर्जुन खोतकर विरुद्ध कैलास गोरंट्याल यांच्यातील राजकीय टोकाचा विरोध आणि कडवी लढत सर्वांनाच अनुभवायला मिळते. विधानसभेच्या आखाड्यात आजवर खोतकर आणि गोरंट्याल हे दोन उमेदवार पाचवेळा आमने-सामने आले आहेत. खोतकर यांनी तीन वेळेस तर गोरंट्याल यांनी दोन वेळेस बाजी मारली आहे. अर्जुन खोतकर हे १९९० आणि १९९५ मध्ये जालना विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून विधिमंडळात गेले होते.
१९९९ पासून खोतकर विरुद्ध गाेरंट्याल अशा लढती झालेल्या आहेत. १९९९च्या निवडणुकीत खोतकर यांची हॅट्ट्रीक होईल, अशी आशा शिवसैनिकांना होती. परंतु, समोर काँग्रेसकडून कैलास गोरंट्याल यांना मैदानात उतरविण्यात आले होते. १९९९ च्या निवडणुकीत गोरंट्याल यांनी खोतकर यांचा पराभव केला. त्यानंतर २००४ च्या निवडणुकीत खोतकर यांनी गोरंट्याल यांचा पराभव करत विजय मिळवला. त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत पुन्हा खोतकर विरुद्ध गाेरंट्याल असा सामना रंगला आणि त्यात अर्जुन खोतकर यांनी गोरंट्याल यांचा पराभव केला होता. २०१९ मध्ये पुन्हा दोघांमध्ये अटीतटीची लढत झाली आणि त्यात कैलास गोरंट्याल यांनी बाजी मारली होती.
नुकत्याच झालेल्या २०२४ विधानसभेच्या निवडणुकीत पाचव्या वेळेस खोतकर विरुद्ध गाेरंट्याल असाच सामना रंगला होता. त्यात अर्जुन खाेतकर यांनी ३१ हजार ६५१ मते अधिक घेत कैलास गोरंट्याल यांचा पराभव केला आहे. विशेष म्हणजे काँग्रेसचे बंडखोर उमेदवार अब्दुल हाफिज यांनी ३० हजार ४५४ मते घेतली असून, गोरंट्याल यांचा ३१ हजार ६५१ मतांनी पराभव झाला आहे. काँग्रेसमधील बंडखोरीचा गोरंट्याल यांना अधिक फटका बसल्याचे दिसून येत आहे.
२००९ मध्ये खोतकर घनसावंगीत२००९ ची विधानसभा निवडणूक अर्जुन खोतकर यांनी घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून लढली होती. त्यात राष्ट्रवादीचे राजेश टोपे यांनी खोतकर यांचा पराभव केला होता. तर जालना विधानसभेच्या २००९ च्या निवडणुकीत गोरंट्याल यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांचा पराभव केला होता.
आमदार मंत्रिपदाच्या शर्यतीतजालन्यातून भाजपच्या तीन उमेदवारांनी आमदारकीची हॅट्ट्रीक मारत विजय मिळवला आहे. तर शिंदेसेनेचे उपनेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी विजय मिळवला आहे. नवीन सरकार स्थापन होण्याची प्रक्रिया सुरू असून, प्रमुख नेत्यांच्या बैठकाही होत आहेत. नव्या मंत्रिमंडळात वर्णी लागण्यासाठी अर्जुन खोतकर, संतोष दानवे, बबनराव लोणीकर, नारायण कुचे हे शर्यतीत दिसत आहेत.
खोतकर विरुद्ध गोरंट्याल लढतीचा निकालवर्ष - विजयी१९९९ - कैलास गोरंट्याल२००४ - अर्जुन खोतकर२०१४ - अर्जुन खोतकर२०१९ - कैलास गोरंट्याल२०२४ - अर्जुन खोतकर