लोकमत न्यूज नेटवर्कजालना : माजी मंत्री अर्जुन खोतकरांनी दोन दिवसांपूर्वी भोकरदन येथील आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या सत्कार सोहळ्यात लोकसभा न लढल्याबद्दल खंत व्यक्त करून जनतेची माफी मागितली. लगोलग रविवारी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत विधानसभा निवडणुकीत भाजपच्या शहर आणि गावपातळीवरील कार्यर्त्यांनी काँग्रेसला साथ दिल्याचा आरोप करून राजकीय वादाला तोंड फोडले. या खोतकरांच्या प्रतिक्रियेवर भाजपने मात्र, सावध भूमिका घेतली असून, खोतकरांशी चर्चा झाल्यावरच या बद्दल बोलता येईल असे मत भाजपच्या वरिष्ठ नेत्याने व्यक्त केले.एप्रिलमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेचे तत्कालीन मंत्री अर्जुन खोतकर यांनी विद्यमान खा. तथा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या विरूध्द लोकसभा लढण्यासाठी मोर्चेबांधणी केली होती. परंतु त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मध्यस्ती करून खोतकरांना माघार घ्यायला लावली होती. त्यावेळी झालेल्या निवडणुकीत खोतकरांनी दानवेंना विजयी करण्यासाठी सर्व ते सहकार्य केल्याचा दावा त्यांनी केला. परंतु नंतरच्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून पाहिजे तशी साथ मिळाली नसल्यानेच आपण पराभूत झाल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. या संदर्भात खोतकरांशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, दानवेंवर आपला रोष नाही, परंतु भाजपच्या शहर आणि गाव पातळीवरील कार्यकर्त्यांनी मात्र, मला साथ देण्या ऐवजी काँग्रेसला मदत केल्याचे आपल्या कानावर आता येत असल्याचे ते म्हणाले.एकूणच शनिवारी भोकरदन येथील कार्यक्रमात खोतकरांनी लोकसभा निवडणुकीतून आपण माघार घेतल्याबद्दल जनतेची माफी मागतो असे सांगून एक प्रकारे आगामी निवडणूकीत दानवे विरूध्द खोतकर असा समाना रंगू शकतो असे संकेत दिल्याची जोरदार चर्चा रजकीय वर्तुळात आहे. खोतकरांच्या आजच्या वक्तव्याबद्दल भाजपच्या वरिष्ठ नेत्याशी संपर्क केला असता, आपण खोतकरां सोबत चर्चा केल्यावर यावर प्रतिक्रिया देऊ असे स्पष्ट केले. या खोतकरांच्या वक्तव्याची दिवसभर शहरात चर्चा रंगली होती.