शहागड (जालना ) : अंबड तालुक्यातील शहागड येथील एका व्यवसायिकाच्या घरावर शनिवारी पहाटेच्या सुमारास सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडा टाकला. रोख रक्कम, दागिन्यांसह तब्बल २६ लाखाचा ऐवज लंपास करण्यात आला आहे.
अंबड तालुक्यातील शहागड येथील व्यावसायिक माणिकलाल जैस्वाल यांचा मोठा मुलगा मनोज जैस्वाल हा कामा निमित्त औरंगाबादला गेला होता. तर छोटा मुलगा, एक मुलगी पती-पत्नी हे चार सदस्य घरी होते. माणिकलाल जैस्वाल नेहमीप्रमाणे दोन बिअरबार, एक देशी दारू दुकान तसेच हॉटेल बंद करून घरी आले. शनिवारी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात दरोडेखोरांनी जैस्वाल यांच्या घराबाहेर पाळत ठेवली. तर चार दरोडेखोरांनी घरातील व परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तोडून, काहींचे तोंड फिरवून, तर काहींचे वायर डिस्कनेक्ट करत त्यांना निकामी केले. बांधकामासाठी वापरात असलेल्या सीडीचा वापर करत किचन खिडकीची जाळी काढून घरात प्रवेश केला.
चोरट्यांनी प्रथम छोटा मुलगा, मुलगी असलेल्या खोलीत प्रवेश केला. मुलांजवळील मोबाईल हिसकावून घेत दार बाहेरून बंद केले. नंतर माणिकलाल यांच्या रूमचे दार लावून घेत त्यांच्या पत्नी असलेल्या बेडरूम मध्ये प्रवेश केला. त्यांनी आरडाओरडा करु नये म्हणून त्याच्या छातीवर पाय ठेवून तलवारीचा धाक दाखवून कपाटातील तिजोरीतील रोख ७ लाख व ५० तोळे सोन्याचे दागिने लुटून घराच्या मागील शेतीमधून पलायन केले.
२५ किलोमीटर अंतर पिंजलेघटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी सी.डी.शेवगण, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, एडीएसचे पोनि यशवंत जाधव, पोलीस नाईक संजय मगरे, एपीआय शिवानंद देवकर, उपनिरीक्षक हनुमंत वारे, धनंजय कवाडे, गोपणीय शाखेचे पो. कॉ.महेश तोटे, बाबा डमाळे आदींनी घटना स्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर दरोडेखोरांच्या शोधार्थ वडी (ता.अंबड) ते गडी (जि.बिड) असा २५ किलोमीटरचा परिसर पिंजून काढला. मात्र, चोरटे हाती लागले नाहीत.