जालना : तुमच्या घरात जादूटोणा करून घरात शांती आणतो असे म्हणून एका इसमास ८७ हजार रुपयांना गंडा घालणाऱ्यास सदर बाजार पोलिसांनी गुरूवारी जेरबंद केले. गणेश ऊर्फ करण नागनाथ गंगावणे (रा. कडा, ता. आष्टी जि. बीड) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून ८७ हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत.
गणेश ऊर्फ करण नागनाथ गंगावणे हा नंदीबैल घेऊन ३० ऑगस्ट २०२१ रोजी तेजवान पिता जलसिंग सैनी (३९ रा. सुखशांती नगर) यांच्या घरी आला. तुमच्या घरात जादूटोणा करून घरातील सर्व समस्या सोडविण्यासाठी व तुमची पत्नी आजारी पडू नये, यासाठी पूजा करावी लागेल. तुम्हाला १३७ किलो मिठाई खाऊ घालावी लागले, असे म्हणून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादीकडून तो ८७ हजार रुपये घेऊन पसार झाला. फसवणूक झाल्याचे कळताच तेजवान पिता जलसिंग सैनी यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावरून पोलीस उपनिरीक्षक भताने यांनी आरोपी नामे गणेश ऊर्फ करण नागनाथ गंगावणे यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून ८७ हजार रुपये जप्त केले. पोलिसांनी नुकतीच ही रक्कम तेजवान पिता जलसिंग सैनी यांच्याकडे परत दिली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. अनिरुद्ध नांदेडकर, पोउपनि. नागनाथ भताणे, पोलीस अंमलदार प्रदीप करतारे, विनोद उरफाटे, महिला कर्मचारी शिला भिसे यांनी केली आहे.