जालना : गोंदी व साष्टपिंपळगाव येथे कारवाई करून मोठ्या प्रमाणात वाळूसाठा जप्त केल्याचा राग मनात धरून अंबडच्या तहसीलदारांना वाळूमाफियाने तहसील कार्यालयात येऊन शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना बुधवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी संशयित पंकज सखाराम सोळुंके (रा. गोंदी, ता. अंबड) याच्याविरुद्ध अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाण करून संशयित पंकज सोळुंके हा फरार झाला होता. त्याला शुक्रवारी सकाळी वडीगोद्री येथून ताब्यात घेण्यात आले आहे.
अंबडचे तहसीलदार विद्याचरण कडवकर हे बुधवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास तहसील कार्यालयात कामकाज करीत होते. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास संशयित पंकज सोळुंके हा तेथे आला. त्याला शिपायांनी बाहेरच थांबण्याचे सांगितले; परंतु तो थांबला नाही अन् कार्यालयात गेला. त्याचवेळी त्याने तहसीलदार कडवकर यांना शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर ताे घटनास्थळावरून फरार झाला.
याप्रकरणी तहसीलदार विद्याचरण कडवकर यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, या घटनेची महसूल कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करून निषेध व्यक्त केला होता. शिवाय, आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी केली होती. यानंतर अंबड पोलिसांनी शुक्रवारी संशयित आरोपीला वडीगोद्री येथून ताब्यात घेतले.