लोकमत न्यूज नेटवर्कजालना : नाशिक जिल्ह्यातील केजीएस साखर कारखान्याच्या कर्जप्रकरणात जालन्यातील डॉ. संजय राख यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करुन बँकेकडून कोट्यवधी रुपयांचे कर्ज उचलेल्याच्या संशयावरुन कारखान्याच्या व्यवस्थापकीय संचालकाला आर्थिक गुन्हे शाखेने नाशिक येथून अटक केली आहे. तर याच प्रकरणातील अन्य तीन आरोपींचा अटक पूर्व जामीन जिल्हा न्यायालयाने सोमवारी फेटाळला.नाशिक येथील के. जी. एस. शुगर अॅण्ड इन्फ्रा कॉर्पोरेशन लि. या साखर कारखान्याने कॅनरा बँक, सेट्रल बँक शाखा सातपूर (नाशिक), इंडीयन ओवरसिज बँक नाशिक रोड या तीन बँकाकडून घेतलेल्या कोट्यवधी रुपये रकमेच्या कर्जासंदर्भात कारखान्याचे तत्कालीन संचालक व जालना येथील डॉ. संजय राख यांच्या बनावट स्वाक्ष-या करुन सदर कर्ज उचलण्यात आले होते. या कोट्यवधी रुपये कर्जाच्या घोटाळा प्रकरणात कारखान्याच्या संचालक मंडळातील दिनकर सखाराम बोडके, प्रल्हाद नामदेव क-हाड, मंजूषा दिनकर बोडके, गणेश प्रल्हाद क-हाड, अनिल मिश्रा व मुख्य कार्यकारी अधिकारी देवाशिष मंडल यांच्यासह इतर पदाधिका-यांनी बँकेच्या तत्कालीन व्यवस्थापक, अधिकारी आणि कर्मचा-यांशी संगनमत करुन हा घोटाळा केला होता.दरम्यान, याप्रकरणी डॉ. संजय राख यांनी कदीम जालना पोलीस ठाण्यात वरील संशयित आरोपीविरुध्द कदीम जालना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यात ७४ कोटी रुपयांच्या कर्ज प्रकरणात डॉ. राख यांची खरी स्वाक्षरी होती. तर नंतर त्या कारखान्याच्या संचालकांनी जवळपास २०० कोटी रुपयापेक्षा अधिक कर्जप्रकरणावर डॉ. राख यांच्या बनावट स्वाक्ष-या केल्याचा अहवाल शासकीय प्रयोग शाळेने दिला आहे. याप्रकरणाचा तपास जालन्यातील आर्थिक गुन्हे शाखेचे एस. बी. बांगर यांच्याकडे होता.आरोपींचा जामीन नामंजूर करताना कोट्यवधी रुपये रकमेच्या घोटाळा प्रकरणी आरोपींची चौकशी होणे आवश्यक असून त्यांनी केलेल्या बनावट स्वाक्षºयांचा उलगडा होण्यासाठी अटकपूर्व जामीन मंजूर करणे योग्य होणार नाही, असा निष्कर्ष न्यायालयाने नोंदवला. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील विपुल देशपांडे यांनी तर फिर्यादी डॉ. संजय राख यांच्यातर्फे अॅड. हरीभाऊ झोल, सुनील किनगावकर आणि प्रवीण मुळे यांनी बाजू मांडली.दिनकर बोडखेला न्यायालयात हजर करणार...याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या दिनकर बोडखेला न्यायलयात हजर करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी दिनकर बोडखे, देवाशिष मंडल, अनिल मिश्रा व गणेश क-हाड यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केले होते.जिल्हा व सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीत देवाशिष मंडल, अनिल मिश्रा व गणेश क-हाड यांचे अटकपूर्व जामीन अर्ज आज नामंजूर करण्यात आले. दिनकर बोडके या आरोपीला पोलिसांनी अटक केल्यामुळे त्याचा अर्ज काढून घेण्यात आला होता.
साखर कारखान्याच्या संचालकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 12:33 AM