'इंडिया नव्हे घमंडीया आघाडी'; रावसाहेब दानवेंची विरोधकांच्या आघाडीवर जोरदार टीका
By विजय मुंडे | Published: August 18, 2023 06:47 PM2023-08-18T18:47:54+5:302023-08-18T18:48:47+5:30
मणिपूर मुद्दा केवळ राजकीय विरोधासाठीच पुढे करण्यात आल्याचीही टीका रावसाहेब दानवे यांनी केली
जालना : संसदेच्या अधिवेशनात मणिपूर मुद्द्यावर पंतप्रधान उत्तर देत असताना विरोधकांनी वॉकआऊट केले. मणिपूरचा मुद्दा विरोधकांनी केवळ राजकीय विरोधासाठीच वापरला असून, ही इंडिया नव्हे तर घमंडीया आघाडी असल्याची टिका केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली. २०१४ पूर्वी जागतिक पातळीवर दहाव्या क्रमांकावर असलेली देशाची अर्थव्यवस्था आज पाचव्या क्रमांकावर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील विकासाचा आलेख वाढत असून, जागतिक पातळीवरही भारताचा गौरव वाढल्याचे ते म्हणाले.
जालना येथील भाजप कार्यालयात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. २० जुलैला संसदेचे मान्सून सत्र सुरू झाले आणि ११ ऑगस्टला ते संपले. डिजिटल व्यक्तिगत डाटा संरक्षण, मध्यस्था विधेयक, तटीय जल कृषी प्राधिकरण, राष्ट्रीय नार्सिंग ऑफ मिड वायफारी २०२३ अशा विविध विधेयकांना मान्यता देण्यात आली. परंतु, संपूर्ण अधिवेशन कालावधीत विरोधकांनी केवळ मणिपूर परिस्थितीवर चर्चा करा, अशी मागणी लावून धरली. वेलमध्ये येणे, वॉक आऊट करणे, महत्त्वपूर्ण बिलांवर चर्चा न करणे यामुळे अनेकवेळा संसदेचे कामकाज तहकूब करावे लागले. इंडिया नव्हे घमंडीया आघाडीने संसदेत अविश्वास प्रस्ताव आणला. पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूर विषयावर उत्तर देत असताना विरोधकांनी वॉकआऊट केले. विरोधकांचा मणिपूर मुद्दा केवळ राजकीय विरोधासाठी होता. अविश्वास ठराव अवाजवी मताने फेटाळण्यात आल्याचेही दानवे म्हणाले.
पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर नाही
भाजप विरोधात झालेली इंडिया नव्हे घमंडीया आघाडी आहे. भाजपकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आश्वासक चेहरा आहे. परंतु, विरोधकांकडे आश्वासक चेहराच नाही. या आघाडीतून पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर झालेला नाही. पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर होताच त्या आघाडीतही फूट पडेल, असेही दानवे म्हणाले.