जालना : लाकडाचा ट्रक सोडण्यासाठी आठ हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी वन विभागाच्या वनरक्षकासह पहारेकऱ्याविरुद्ध एसीबीच्या पथकाने बुधवारी सायंकाळी कारवाई केली. विशेष म्हणजे, लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सापळा रचल्याचा संशय येताच वन विभागाच्या पहारेकऱ्याने स्वीकारलेली लाचेची रक्कम फेकून पळ काढला.
तक्रारदाराचा लाकडाचा व्यवसाय आहे. तक्रारदाराने लाकडाने भरलेला ट्रक (क्र. एम.एच.१८- बी.जी. ८६८६) हा मालेगावकडे पाठविला होता. हा ट्रक अंबड शहराजवळील घनसावंगी टी पॉइंटजवळ मंगळवारी रात्री वन विभागाचे वनरक्षक संदीप नाईकवाडे यांनी थांबविला. हा ट्रक सोडण्यासाठी संदीप नाईकवाडे व पहारेकरी गणेश विठ्ठल तुपे यांनी आठ हजार रुपये लाचेची मागणी केली तसेच ट्रक नेहमी सुरू ठेवण्यासाठी हप्ता म्हणून पाच हजाराची मागणी केल्याची तक्रार तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली.
ही तक्रार प्राप्त होताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला. घनसावंगी टी- पॉइंटजवळील वन उद्यान कार्यालयाच्या आवारात पहारेकरी गणेश तुपे याने लाचेची रक्कम स्वीकारली. संबंधिताने इशारा करताच तुपे याला सापळा लावल्याचा अंदाज आला. त्यामुळे त्याने स्वीकारलेली रक्कम फेकून पळ काढला. या प्रकरणात वनरक्षक संदीप नाइकवाडे, पहारेकरी गणेश तुपे यांच्याविरुद्ध अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलिस अधीक्षक विशाल खांबे, पोलिस उपअधीक्षक सुदाम पाचोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शेख, अंमलदार गणेश चेके, जावेद शेख, गणेश बुजाडे, ज्ञानदेव जुंबड, शिवाजी जमधडे, कृष्णा देठे, चालक राजेजाधव यांच्या पथकाने केली. एसीबीच्या या कारवाईमुळे लाचखोरांचे धाबे दणाणले आहेत.
संगनमताने केली लाचेची मागणीएसीबीच्या पथकाने सापळा रचल्यानंतर तक्रारदाराकडून पहारेकऱ्याने आठ हजार रुपये ट्रक सोडण्यासाठी व हप्ता म्हणून पाच हजार रुपये मागितले. ही रक्कम वनरक्षक व पहारेकरी यांच्या संगनमताने मागणी केल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाच्या निदर्शनास आले. त्यानुसार या प्रकरणात अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याचे लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडून सांगण्यात आले.