परतूर, आंबा (जि. जालना) : परतूर तालुक्यातील दैठणा ( खु ) येथे चहा करताना अचानक गॅस सिलिंडरला लागलेल्या गळतीमुळे आगीचा भडका उठला. त्यातच आई व मुलगा प्रसंगावधान साधत घरातून बाहेर पडले. त्यामुळे यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. ही घटना गुरुवारी सकाळी घडली. या आगीत संसारोपयोगी साहित्य व रोख २ लाख ३ हजार रुपये असे एकूण चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
दैठणा खुर्द येथील विष्णू सवणे यांच्या आई सकाळी घरात चहा करीत होत्या. तेवढ्यात अचानक गॅसला गळती लागल्याने आगीचा भडका उठला. आग लागताच मुलगा व आई घराबाहेर पडले. आगीने रौद्ररूप धारण केले. गॅसची टाकी असल्याने स्फोट होण्याची शक्यता होती. यामुळे ग्रामस्थही भयभीत झाले होते. घराजवळ जाण्यास कोणीही धजावत नव्हते. ग्रामस्थांनी परतूर येथील अग्निशमन दलाला याची माहिती दिली. अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. त्यानंतर आग आटोक्यात आली.
या आगीत संसारोपयोगी साहित्य, रोख रक्कम दोन लाख असा मुद्देमाल जळून खाक झाला आहे. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. यावेळी शिवाजी सवणे, दीपक सवने, दत्ता सवणे, गणेश सवने, सरपंच सोनाजी गाडेकर, खंडेराव सवणे, रंगनाथ सवणे, ज्ञानेश्वर सोनवणे ईश्वर घुमर, विशाल सवणे आदींची उपस्थिती होती. झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून भरपाई देण्याची मागणी नागरिकांनी केली.