भोकरदन (जि. जालना) : शहरातील चोरीच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मागील आठवड्यात तुळजाभवानी नगरमधील मंदिरामध्ये पुजाऱ्याला चोरट्याने रात्री दोन वाजेच्या सुमारास बेदम मारहाण केल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असताना भोकरदन शहरातील नाकोडानगर, पवननगरमध्ये शनिवारी रात्रीत सात ठिकाणी घरफोड्या झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, चोरट्यांनी रोकड लंपास करण्यापूर्वी घरातील जेवणावर ताव मारल्याचे उघड झाले आहे.
पवननगरमधील गजानन खरात यांच्या आईची तब्येत बरी नसल्याने ते गावी गेले होते. त्यांच्या घरात रात्री शनिवारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून स्वयंपाक घरात प्रवेश केला. किचनमध्ये जेवण केल्यानंतर कपाट तोडून त्यांनी जवळपास ७० हजार रुपये रोख रक्कम, चार तोळ्यांचे सोन्याचे दागिने, असा २ लाख ७७ हजार ८०० रुपयांचा ऐवज लंपास केला. त्याचबरोबर सहशिक्षक नरेंद्र गिरी यांच्या घरातदेखील चोरट्यांनी घरातील किरकोळ साहित्य आणि रोख रक्कम पाच ते सात हजार रुपये लंपास केले आहेत. गजानन खरात यांच्या घरासमोर असलेले लोणकर यांच्या घराचे कुलूप तोडले; परंतु त्या घरात कोणीच राहत नसल्याने ते घर रिकामे होते. नुकतेच त्यांचे भाडेकरू घर खाली करून गेले होते. त्यामुळे तेथे चोरी करता आली नाही.
नरेंद्र गिरी यांच्या घराच्या पाठीमागे असलेल्या पूनम तराडे यांच्या घरामध्येदेखील चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून प्रवेश केला. त्यामध्ये घरात केवळ साहित्याची फेकाफेक केली. सुनील जाधव यांच्या घरामध्ये लहान मुलांचे दागिने, रोख रक्कम लंपास केली आहे. सुनील जाधव यांच्या घरामधील कपाटदेखील तोडून नुकसान केले आहे.
अंड्यावर तावतसेच अमोल देशमुख यांच्या घरातदेखील चोरट्यांनी प्रवेश केला होता. या घरामध्ये भाडेकरू राहतात; परंतु भाडेकरू शनिवारी आणि रविवारी सुटी असल्याने गावाकडे गेले होते. चोरट्यांनी त्या घराचे कुलूप तोडून आत शिरले. येथे त्यांना केवळ अंडे खाण्यास मिळाले. अंड्यावर ताव मारून चोरट्यांनी पोबारा केल्याचे दिसून आले आहे.