जालना : मूलबाळ होत नसल्यामुळे झालेल्या वादातून डोक्यात धारदार शस्त्राने वार करून पत्नीचा खून केल्याची घटना जालना शहरातील शंकरनगर येथे शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. इंदूबाई किशोर आटोळे (४२, रा. शेळगाव आटोळ, ता. चिखली, जि. बुलढाणा) असे मयत महिलेचे नाव आहे, तर किशोर हिम्मतराव आटोळे (४५) असे संशयिताचे नाव आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील शेळगाव आटोळ येथील रहिवासी किशोर आटोळे व इंदूबाई आटोळे हे सात महिन्यांपासून जालना शहरातील शंकरनगर भागात किरायाने रूम करून राहत होते. किशोर आटोळे हा औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीत मजूर म्हणून काम करीत होता. त्यांना मूलबाळ होत नसल्याने रोज त्यांच्यामध्ये वादावादी होत होती. गुरुवारी रात्री त्याच कारणावरून त्यांचे भांडण झाले. पती किशोर आटोळे याने रागाच्या भरात पत्नीच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार केले. यात इंदूबाई आटोळे यांचा मृत्यू झाला.
पत्नीच्या मृत्यूनंतर किशोर आटोळे हा दरवाजा बंद करून फरार झाला होता. शुक्रवारी सकाळी नातेवाईक घरी आले असता, हा प्रकार उघडकीस आला. याची माहिती कदीम पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू, पोलिस उपनिरीक्षक गणेश शिंदे, पोलिस उपनिरीक्षक ज्ञानदेव नागरे, कैलास जावळे, बाबा गायकवाड यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केला.
आरोपी अटकेतखून करून दरवाजा लावून संशयित किशोर आटोळे हा फरार झाला होता. त्याचा पोलिस दिवसभरापासून शोध घेत होते. रात्री सात वाजेच्या सुमारास त्याला जालना शहरातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, अशी माहिती तपास अधिकारी गणेश शिंदे, पोउपनि. ज्ञानेश्वर नांगरे यांनी दिली. दरम्यान, प्रकरणी प्रतिभा आटोळे यांच्या फिर्यादीवरून कदीम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.