जालना : झालेली बदली रद्द झाल्याने विनापरवाना डिजे वाजविण्यासह रस्त्यावर मांडव टाकून वाहतुकीला अडथळा निर्माण करण्यासह जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी महावितरणचे सहायक अभियंता प्रकाश चव्हाण यांच्यासह २० ते ३० जणांविरूध्द सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महावितरणच्या जालना ग्रामीण विभागात सहायक अभियंता असलेले प्रकाश चव्हाण यांची दीड महिन्यापूर्वी रत्नागिरी झोनमध्ये बदली झाली होती. मात्र, एकाच महिन्यात त्यांची रत्नागिरी येथील बदली रद्द होवून परत जालना येथेच झोन क्र. ३ मध्ये त्याच ठिकाणी त्यांची बदली करण्यात आली. १८ ऑगस्ट रोजी बदलीचे आदेश हातात पडताच ते शहरात दाखल झाले होते. चव्हाण हे जालन्यात आल्याची माहिती मिळताच काही कंत्राटदार व समर्थकांनी राजूर चौफुली येथूून त्यांना खांद्यावर घेत डिजे लावून वाजतगाजत जंगी मिरवणूक काढली.
मिरवणुकीने कार्यालयात आल्यानंतर सदर बाजारच्या हद्दीत भररस्त्यावर मांडव टाकून त्यांचा स्वागतसोहळाही साजरा करण्यात आला. डिजेला परवानगी नसल्याचे आणि रस्त्यावरील मांडवामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याने सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी तातडीने ॲक्शन घेतली. याप्रकरणी पोकॉ. मधूर राजमाने यांच्या फिर्यादीवरून सहायक अभियंता प्रकाश चव्हाण यांच्यासह २० ते ३० जणांविरूध्द भादंवि. १४३, १८८, २८३, मपोका. १३५ कलमान्वये सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोना. आगळे हे करीत आहे.