जालना : पत्नीसोबत झालेल्या भांडणाचा राग मनात धरून चिमुकलीला विषारी द्रव पाजून एकाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी शहागड येथे उघडकीस आली. यात चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. श्रेया पंडित (वय ७) असे मृत चिमुकलीचे नाव आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
येथील कृष्णा पंडित (३१, रा. शहागड, ता. अंबड) हा कॉम्प्युटरचा व्यवसाय करतो. त्याची पत्नी मनीषा या एका बँकेत काम करतात. सोमवारी बँक बंद झाल्यानंतर त्या घरी गेल्या. कृष्णा हा मनीषा यांच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यातूनच पती-पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण झाले. मनीषा या दोन्ही मुलींना घेऊन माहेरी निघाल्याने कृष्णाने त्यांच्या डोक्यात वीट मारली. डोक्यातून रक्त निघाल्याने मनीषा यांनी खासगी रुग्णालय गाठले. उपचार घेतल्यानंतर त्या मावस भावाकडे राहण्यासाठी गेल्या.
मंगळवारी सकाळी दहा वाजता कृष्णा हा दोन्ही मुलींना घेऊन पत्नीकडे गेला. मनीषा यांना घरी चल, नाही तर मी मुलींना मारून टाकीन, अशी धमकी दिली. भांडण झालेले असल्याने मनीषा यांनी जाण्यास नकार दिला. त्यानंतर कृष्णा घराबाहेर गेला. त्याने श्रेया या मुलीला विषारी द्रव पाजले. दुसरी मुलगी शिवाज्ञा हिला विषारी द्रव पाजायचा प्रयत्न करीत असतानाच नातेवाइकांनी तिला बाजूला केेले. नंतर त्याने स्वत: विष प्राशन केले. उलट्या होऊन दोघेजण बेशुद्ध पडले. त्यामुळे नातेवाइकांनी तात्काळ दोघांना सुरुवातीला गेवराई व नंतर बीड येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
बुधवारी कृष्णा याची तब्येत बरी झाली. परंतु, मुलीच्या तब्येतीत सुधारणा झाली नाही. गुरुवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास तिची प्राणज्योत मालवली. बीड येथील जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर तिच्यावर शहागड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मनीषा पंडित यांच्या तक्रारीवरून संशयित पती कृष्णा पंडित याच्यावर शहागड पोलिस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक केल्याची माहिती शहागड पोलिस चौकीचे पोलिस उपनिरीक्षक गणेश राऊत यांनी दिली.