- शिवचरण वावळेजालना : केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे’ या उक्तीप्रमाणे अश्विनी मोटरकर हिने मातीच्या मडक्यांना आकार देत जिद्दीने अभ्यास केला. अनेक स्पर्धा परीक्षांना सामोर गेली. तिच्या या जिद्दीच्या जोरावर तिच्यासाठी एक-दोन नव्हे, तर एकाच वेळी सहा शासकीय नोकरीची दारे उघडली गेली आहेत. तिच्या या उत्तुंग यशाबद्दल तिचे कौतुक होत आहे.
घरची परिस्थिती अतिशय प्रतिकूल असल्याने अश्विनीने रोज वडील गोरखनाथ मोटारकर यांना मातीची मडके घडविण्यात मदत करायची. घडवलेली मडकी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात वडील माठ विक्रीसाठी बसत असे. कधी ग्राहक मिळत होते, तर कधी नाही. रोज नवीन धडा शिकवणाऱ्या परिस्थितीशी दोन हात करत तिने शहरातील मावसभावाकडे राहून वाणिज्य शाखेत पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
यानंतर स्पर्धा परीक्षेसह इतर शासकीय सेवेतील संधी शोधणे सुरू केले. त्यासाठी तिला सलग दोन वर्षांपासून कठीण परीक्षेला सामोर जावे लागले. तरी यश प्राप्त होताना दिसत नव्हते. मात्र मातीच्या घड्याला आकार देताना अनेक वेळा घडवलेला मातीचा घडा फुटतो आणि पुन्हा नव्याने मातीला आकार देऊन घडा तयार करावा लागतो. त्याप्रमाणे तिने परीक्षेत अपयश आले तरी, जिद्द कधीच सोडली नाही.
दोन वर्षांच्या मेहनतीचे फळ, सहा जागी निवडदोन वर्षांनी का होईना तिच्या मेहनतीला फळ आले आहे. एक-दोन नव्हे तर, तब्बल सहा सरळ सेवा भरती परीक्षांमध्ये अश्विनीने यश संपादन केले. यात बारामती येथील अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्टेनोग्राफर, छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात लिपिक, महसूल विभागातर्फे घेण्यात आलेली तलाठी भरती परीक्षा, जालना जिल्हा परिषद लेखा विभागात कनिष्ठ सहायक, बृहन्मुंबई महानगरपालिका येथे टायपिस्ट आणि जालना जिल्हा परिषदेसाठी स्टेनोग्राफर अशा सहा ठिकाणी तिला नोकरीची संधी प्राप्त झाली आहे.
नुकताच झाला विवाह नुकतेच अश्विनीचे जालना शहरातील स्पर्धा परीक्षांची तयारी करत असलेले उच्च शिक्षित सचिन गोडबोले यांच्यासोबत विवाह झाला आहे. या यशाबद्दल महाराष्ट्र कुंभार समाज सामाजिक संस्थेच्यावतीने जालना महापालिकेचे सहायक आयुक्त केशव कानपुडे यांनी तिचा सत्कार केला. अश्विनी सध्या बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्टेनोग्राफर या पदावर कार्यरत आहे.