कोविड-१९ लसीकरणाच्या अनुषंगाने खासगी वैद्यकीय व्यावसायिकांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात गुरुवारी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, डब्ल्यूएचओचे डॉ. मुजीब, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनखेडकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष कडले आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना जिल्हाधिकारी बिनवडे म्हणाले, गेल्या वर्षभरात कोविड-१९ या महामारीच्या परिस्थितीमध्ये खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी जिल्हा प्रशासनाला मोठ्या प्रमाणात सहकार्य केले. त्यांनी केलेल्या सहकार्यामुळे कोविडचा मुकाबला आपण यशस्वीरित्या करू शकलो. कोविड-१९ सोबतच्या लढाईचा हा अंतिम टप्पा असून या लसीकरणाच्या मोहिमेमध्ये खासगी वैद्यकीय व्यावसायिकांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यामध्ये आरोग्य क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाला ही लस देण्यात येणार असून, लस देण्यासाठी लाभार्थ्यांची नोंदणीही करण्यात आलेली आहे. लसीकरणासाठी आवश्यक असलेली नोंद करण्यापासून कोणी वंचित राहिले असल्यास तातडीने नोंदणी करून प्रत्येकाने लस घ्यावी तसेच लस घेतल्यानंतर ती सुरक्षित असून तसा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवावा, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले. यावेळी डब्ल्यूएचओचे डॉ. मुजीब यांनी लसीकरणाच्या अनुषंगाने पॉवरपॉईंटच्या माध्यमातून माहिती देण्याबरोबरच खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी विचारलेल्या शंकांचे निरसनही त्यांनी यावेळी केले.
कोविशिल्डचे १४ हजार २२ डोसेस प्राप्त
१६ जानेवारीला जालना जिल्ह्यात कोविड-१९ च्या लसीकरणाचा चार ठिकाणी शुभारंभ करण्यात येणार आहे. यामध्ये जिल्हा रुग्णालय, जालना, ग्रामीण रुग्णालय, परतूर, ग्रामीण रुग्णालय, भोकरदन तसेच उपजिल्हा रुग्णालय अंबड या केंद्राचा समावेश आहे. सिरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्डचे १४ हजार २२ डोसेस जिल्ह्याला प्राप्त झाले आहेत. लसीकरणासाठी चारही ठिकाणी प्रशिक्षित वर्ग ठेवण्यात आला असून, पहिल्या टप्प्यामध्ये आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्यांना लस टोचण्यात येणार आहे. दरदिवशी १०० व्यक्तींना लस टोचण्याचे नियोजन या केंद्राच्या माध्यमातून करण्यात आले असल्याची माहितीही जिल्हाधिकारी बिनवडे यांनी दिली.
शीतसाखळी कक्षाची पाहाणी
जिल्ह्यात सुरू होणाऱ्या कोविड १९ लसीकरणाच्या अनुषंगाने जिल्हा रुग्णालयामध्ये उभारण्यात आलेल्या लसीकरण कक्षाची तसेच जिल्ह्याला प्राप्त झालेल्या कोविशिल्ड डोसेस ठेवण्यात आलेल्या शित साखळी कक्षाची जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी पाहाणी केली. यामध्ये कुठल्याही प्रकारची उणीव राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.