लोकमत न्यूज नेटवर्कअंबड : इलेक्ट्रीक कटरच्या सहायाने महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन आरोपींना अंबड पोलिसांनी सहा तासांत जेरबंद केले. ही घटना बुधवारी दुपारी अंबड शहरात घडली होती.बँक आॅफ महाराष्ट्रचे शाखा प्रबंधक कुंदन टिकाराम वलवे यांनी अंबड ठाण्यात तक्रार दिली आहे. अंबड येथील बँकेचे एटीएम बुधवारी दुपारी इलेक्ट्रीक कटरच्या सहायाने फोडून चोरी करण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. घटनेची माहिती मिळताच पोनि अनिरूध्द नांदेडकर यांनी पथकाला तपासाच्या सूचना दिल्या.घटनास्थळी चोरट्यांनी वापरलेले इलेक्ट्रीक कटर मशीनचे पॅकींग बॉक्स मिळून आला. पॅकींग बॉक्सवरून व बँकेतील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींचा शोध सुरू केला.अवघ्या सहा तासांतच सदानंद आबाजी वैद्य (रा. शिरनेर ता. अंबड), राहूल उर्फ लिंबाजी गोविंदराव बोरूडे (रा. चांगलेनगर अंबड) या दोघांना रात्रीच्या सुमारास जेरबंद केले. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सी.डी. शेवगण यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि अनिरूध्द नांदेडकर, सपोनि संतोष घोडके, पोउपनि सुग्रीव चाटे, सहायक फौजदार शेळके, पोकॉ विष्णू चव्हाण, पोना यशवंत मुंढे, शमीम बरडे, देशमुख, तडवी, पोकॉ महेंद्र गायके, डोईफोडे, वंदना पवार, चालक हैदर यांच्या पथकाने केली.अंबड पोलिसांनी अटक केलेल्या दोघांना गुरूवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्या दोघांना २४ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोउपनि सुग्रीव चाटे हे करीत आहेत.