दीपक ढोले ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : विविध बँक ग्राहकांच्या सोयीसाठी असलेले एटीएम सुरक्षेअभावी आता चोरट्यांच्याही सोयीचे होऊ लागल्याचे चित्र शुक्रवारी मध्यरात्रीनंतर लोकमत टीमने केलेल्या स्टिंग आॅपरेशनद्वारे समोर आले आहे. जिल्ह्यातील चोरीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ४० पैकी काही एटीएम केंद्रांना भेट दिल्यानंतर यापैंकी काही केंद्रे असुरक्षित असल्याचे आढळून आले.गेल्या काही दिवसांपासून शहरासह जिल्हाभरात चोरी प्रमाण वाढले आहे. या अनुषंगानेच लोकमतच्या टिमने शुक्रवारी मध्यरात्री शहरातील एटीएमची पाहाणी केली. मध्यरात्री १२.३० वाजता भोकरदन नाका येथील आयडीबीआय व बँक आॅफ महाराष्ट्रच्या एटीएम केंद्रात सुरक्षारक्षक नव्हता. काही अंतरावरील एसव्हीसी व कॅनरा बँकेच्या केंद्रावर सुरक्षारक्षक होता. यानंतर मंमादेवी येथील युनियन बँकेच्या केंद्रावरही सुरक्षारक्षक नसल्याचे दिसून आले. रेल्वेस्थानक मार्गावरील गांधीचमन येथील स्टेट बँक आॅफ हैद्राबादच्या एटीएम केंद्रातही सुरक्षारक्षक नव्हता. या केंद्रापासून हकेच्या अंतरावर असलेल्या कॅनरा बँक व युनियन बँकेच्या केंद्रावरही रक्षक दिसून आला नाही. याच परिसरातील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या केंद्रावरही सुरक्षा नव्हती. त्यानंतर बडीसडक येथील जवळपास सर्वच एटीएम केंद्राची सुरक्षा रामभरोसेच दिसून आली. पाणीवेस येथील एका एटीएम केंद्रात एक सुरक्षारक्षक झोपलेल्या अवस्थेत दिसून आला. बसस्थानक येथील बँक आॅफ इंडियाच्या केंद्रावरही रक्षक नव्हता. लक्कडकोट चौकासमोरील भागात अॅक्सिस बँकेचे केंद्रही रक्षकाविनाच होते. मामा चौक परिसरातील एटीएम केंद्रेवरही सुरक्षारक्षक दिसला नाही. जालना शहरात नवीन व जुना जालना भागात मिळून विविध बँकांचे एटीएम ४० मशीन्स आहेत. मात्र बोटावर मोजण्या इतक्याच एटीएमवर सुरक्षा रक्षक होते. बहुतांश बँकांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर विश्वास ठेवल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे वर्दळ नसलेल्या रस्त्यांवर तसेच काही संवेदशील भागातही सुरक्षा रक्षक नाहीत. मोजके एटीएम सोडले तरी बहुतांश ठिकाणी आतील बाजूने सीसीटीव्ही आहेत. काही ठिकाणी मशीनच्या दरवावाज्यांचीही मोडतोड झाल्याचे स्पष्ट झाले. एटीएमवर सुरक्षारक्षकच नसल्याची संधी साधत चोरटे मोठा डाव साधण्याची शक्यता नाकारता येत नाही.सीसीटीव्हीवरच सुरक्षेचा भारराष्ट्रीय बँंकांसह सहकारी बँंकांच्या एटीएमची सुरक्षा रामभरोसे असून सीसीटीव्ही यंत्रणेवरच बँंकांची सुरक्षा अवलंबून आहे. शहरात बँंक आॅफ इंडिया, स्टेट बँक आॅफ इंडिया, युनियन बँंक, बँंक आॅफ महाराष्ट्र, आयडीबीआय, आयसीआयसीआय या बँंकांसह जिल्हा मध्यवर्ती बँंका कार्यरत आहेत. दररोज करोडो रुपयांची उलाढाल होणाºया या बँंकाच्या एटीएमची सुरक्षा रामभरोसे असून केवळ सीसीटीव्ही यंत्रणेवर एटीएमची सुरक्षा अवलंबून आहे. राष्टÑीयीकृत बँंकाच्या एटीएममध्ये दिवसा सुरक्षारक्षक तैनात असल्याचे दिसून येतात पण एटीएमसमोर रात्री कोणतीही सुरक्षा यंत्रणा कार्यरत असल्याचे दिसून येत नाही.तालुक्यांमध्येही अशी स्थितीजिल्ह्यातील अंबड, जाफराबाद, भोकरदन, घनसावंगी, बदनापूर, मंठा, परतूर तालुक्यांतील एटीएम केंद्रातही सुरक्षारक्षक नसल्याचे समोर आले आहे.साठीत सुरक्षेची काठीशहरातील काही बँकांच्या एटीएममध्ये सुरक्षा रक्षक दिसून आले. परंतु, यासर्व केंद्रावर वयाची साठी पार केलेल्या वयोवृद्ध सुरक्षारक्षकाची नेमणूक केली आहे. त्यांच्याकडे सुरक्षेसाठी काठीही आढळली नाही.
एटीएम रामभरोसे...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2018 12:39 AM