जालना : अनेक गुन्हे दाखल असलेल्या एका संशयितास पोलिस मारहाणीच्या गुन्ह्यात पकडण्यासाठी गेले असता, त्याने पथकावर हल्ला करून अंधाराचा फायदा घेत पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. ही घटना खादगाव शिवारात शुक्रवारी रात्री १० वाजता घडली. या प्रकरणी संशयितासह त्याच्या भावाविरुध्द शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी चंदनझिरा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लखन कचरु घोरपडे (२९), पप्पू कचरु घोरपडे (३२, दोघे रा. खादगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत, अशी माहिती पोलिस निरीक्षक संग्राम राजपूत यांनी दिली.
लखन घोरपडे याच्याविरुध्द चंदनझिरा ठाण्यात कलम ३२६ नुसार मारहाणीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक शिवाजी पोहार, पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल शिंदे, कर्मचारी देशमुख, चव्हाण यांचे पथक शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास खादगाव शिवारात गेले होते. यावेळी लखन याने पथकावर हल्ला केला. नंतर अंधाराचा फायदा घेत पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. पळताना लखन घोरपडे हा खड्डयात पडल्याने त्याच्या पायाला गंभीर इजा झाली. नंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चंदनझिरा ठाण्यात आणले. तेथून त्याला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या घटनेनंतर लखन याचा भाऊ पप्पू घोरपडे हा पोलिस ठाण्यात आला. त्याने तिथे आरडाओरडा करून शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी संशयित दोघा भावांविरुध्द पोलिस उपनिरीक्षक शिवाजी पोहार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चंदनझिरा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.