जालना: दारूच्या नशेत घरची काही शेती विकली आणि गुप्तधन शोधण्याचा नाद लागला. गुप्तधनाच्या लालसेत चक्क स्मशानभूमी पालथी घातली आणि घरातील गुप्तधन शोधण्याच्या प्रयत्नात पतीने पत्नीचाच नरबळी देण्याचा घाट घातल्याचा प्रकार डोणगाव (ता. जाफराबाद, जि. जालना) येथे गुरुवारी उघडकीस आला. टेंभुर्णी पोलिसांनी या प्रकरणात पतीसह मांत्रिक महिला व एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.
सीमा संतोष पिंपळे (रा. डोणगाव, ता. जाफराबाद, जि. जालना) असे पीडित महिलेचे नाव आहे. डोणगाव येथील सीमा पिंपळे यांचा पती संतोष बाबूलाल पिंपळे याला दारूचे व्यसन लागले होते. दारूच्या व्यसनात संतोष पिंपळे याने घरची काही शेती विकली. दारूच्या नशेत असणाऱ्या संतोषला गुप्तधन शोधण्याचा नाद लागला आणि तो रात्री-अपरात्री गावा व परिसरातील गढी, स्मशानभूमीमध्ये फिरू लागला.
सीमा पिंपळे या २२ सप्टेंबर रोजी रात्री मुलांसह घरी होत्या. त्यावेळी संतोष पिंपळे, गावातील जीवन पिंपळे व एक मांत्रिक महिला घरी आली आणि घरातील लाकडी खांबाला काहीतरी धरबंधन करून निघून गेली. त्यानंतर रात्रीच्या सुमारास संतोष पिंपळे याने गुप्तधनासाठी बळी द्यायचा म्हणून पत्नी सीमा पिंपळे यांना हळदी-कुंकू, अगरबत्ती लावण्याचा प्रयत्न केला.
विरोध केल्यानंतर संतोषने त्यांना मारहाण केली. तुझा बळी देऊन गुप्तधन काढतो, असे संतोष म्हणताच त्यांनी आरडाओरड केली. त्यानंतर त्यांचा मुलगा, शेजारील नागरिकांनी धाव घेऊन त्यांची सुटका केल्याची तक्रार सीमा पिंपळे यांनी २३ सप्टेंबर रोजी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार संतोष पिंपळे, जीवन भिका पिंपळे व मांत्रिक महिलेविरुद्ध महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा जादूटोणा प्रतिबंध अधिनियम २०१३ कलम ३ (१) (ख), ४ सह कलम ३२३, ४०५, ५०६, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलाच्या डोक्यावर, मुलीच्या पायावर ठेवला हात-
मांत्रिक महिला सीमा पिंपळे यांच्या घरी आली आणि पलंगावर झोपलेल्या मुलांजवळ गेली. मुलगा विवेक याच्या डोक्यावर आणि मुलगी श्रावणी हिच्या पायावर हात ठेवला. त्यानंतर घराच्या खांबाला काहीतरी बांधले आणि गुप्तधनाचा उजेड पडला, मला सगळं दिसतंय असे सांगून ती निघून गेली. दोन्ही मुलांच्या डोक्यावर हात ठेवल्याने त्यांचाही नरबळी देण्याची तयारी होती की काय, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. शिवाय त्या दृष्टीने तपास सुरू आहे.
दोघांना कोठडी-
नरबळी देण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तत्काळ संतोष पिंपळे व जीवन पिंपळे या दोघांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तसेच मांत्रिक महिलेला रविवारी पोलिसांनी अटक केली आहे. तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.