जालना : खंडणीसाठी शहरातील उद्योजक राजेश सोनी यांच्या अपहरणाचा प्रयत्न करणाऱ्या पाच जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी ताब्यात घेतले. संशयीत आरोपींमध्ये राजेंद्र बाबासाहेब राऊत ऊर्फ राजन बाबुराव मुजमुले (२६ रा. परतूर, जि. जालना), विशाल संजय जोगदंड (२० रा. जोगदंड मळा, जालना), भागवत ऊर्फ संभ्या बालाजी राऊत (वय २० ), पांडुरंग ऊर्फ ओम बबन वैद्य (वय २४, दोघे रा. वैद्यचा मळा, जालना), मोहम्मद इरफान मलिक (रा. पडेगाव, औरंगाबाद) यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून दोन गावठी बंदुका, पाच जिवंत काडतूस, एक चारचाकी वाहन व खंजर असा १२ लाख ३५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
शहरातील उद्योजक राजेश सोनी हे २३ फेब्रुवारी रोजी जालना शहराजवळील दत्ताश्रमात दर्शनासाठी गेले होते. तेव्हा विना क्रमांकाच्या कारमधून आलेल्या दोघांनी त्यांना गावठी बंदुकीचा धाक दाखवून गाडीत बसविण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांचा हा प्रयत्न फसला. त्यानंतर अपहरणकर्ते गाडी घेऊन फरार झाले. या गुन्ह्याचा तपास करत असताना खबऱ्यांमार्फत मिळालेल्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राजेंद्र राऊत, विशाल जोगदंड, भागवत राऊत, पांडुरंग वैद्य, मोहम्मद मलिक यांना ताब्यात घेतले.
सदरील गुन्ह्याबाबत त्यांच्याकडे विचारपूस केली असता, त्यांनी कर्ज फेडण्यासाठी उद्योजक राजेश सोनी यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून १२ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. सुभाष भुजंग, सपोनि. शिवाजी नागवे, पोउपनि. दुर्गेश राजपुत, सॅम्युअल कांबळे, कृष्णा तंगे, सचिन चौधरी, सागर बाविस्कर, देविदास भोजने, विलास चेके, संदीप मांटे, सुरज ताठे व तालुका पोलीस ठाण्याचे सपोनि. संभाजी वडते यांनी केली.
एकावर २५ गुन्हे दाखलराजेंद्र राऊत हा सराईत गुन्हेगार आहे. तो नियमित आपले नाव बदलत असतो. त्याच्यावर जालना शहरासह इतर जिल्ह्यात २५ गुन्हे दाखल आहेत, तर पांडुरंग वैद्य याच्याविरूध्द टेंभुर्णी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.