जालना : शहरातील बालसुधारगृहात १६ वर्षीय प्रियकराने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( Attempted suicide of a minor lover in a juvenile detention center )
बदनापूर येथील अल्पवयीन प्रेमीयुगुल १९ जून रोजी मुंबई येथे पळून गेले होते. या प्रकरणी बदनापूर पोलिसांनी मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. गायब झालेल्या या प्रेमीयुगुलास कल्याण रेल्वे स्थानकावर २० जून रोजी रेल्वे पोलिसांनी पकडले होते. याची माहिती बदनापूर पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर दोघांनाही पोलिसांनी कल्याण येथून २२ जूनला बदनापूर येथे आणले. दरम्यान, मुलीच्या जबाबावरून प्रियकराविरुद्ध बदनापूर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रियकर अल्पवयीन असल्यामुळे त्यास न्यायालयात हजर करून मंगळवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास जालना येथील शासकीय बालसुधारगृहात दाखल केले होते.
बालसुधारगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू असतानाच प्रियकर लघुशंकेला जाण्याचा बहाणा करून शौचालयात गेला. त्या ठिकाणी हारपिक टॉयलेट क्लिनर हे द्रव प्राशन केल्याचा संशय पोलिसांना आला. त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला जिल्हा रुग्णालयातून औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात नेण्यात आले. सदर प्रियकर मुलाची प्रकृती सुधारली असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक पूजा पाटील यांनी दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक पूजा पाटील यांच्या फिर्यादीवरून आत्महत्येचा प्रयत्न केल्याबद्दल कदीम जालना पोलीस ठाण्यात प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.