जाफराबाद : शहरातील देऊळगाव राजा रोडवर असलेल्या जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेतील तिजोरी लुटण्याचा अयशस्वी प्रयत्न चोरट्यांनी केला. ही घटना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुुमारास घडली असून, बँकेच्या तिजोरीत दुष्काळी अनुदानाचे तब्बल २९ लाख रूपये होते.जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची जाफराबाद येथे शाखा आहे. सध्या या शाखेतून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून मिळालेल्या अनुदानाचे वाटप केले जात आहे. चोरट्यांनी गुरूवारी मध्यरात्री बँक इमारती समोरील गेटचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. चोरट्यांनी प्रारंभी बँकेतील सीसीटीव्ही कॅमेरे फोडले. त्यानंतर तिजोरी फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. मात्र, तिजोरी न फुटल्याने चोरट्यांनी बँकेतून पळ काढला.शुक्रवारी सकाळी बँक उघडण्याच्यावेळी कर्मचारी भास्कर कळंबे, संजय उबरहंडे हे बँकेत आले. त्यावेळी बँकेच्या शटरचे कुलूप तुटल्याचे तसेच सीसीटीव्ही कॅमेरे फुटल्याचे त्यांना दिसले. त्यांनी लगेच या घटनेची माहिती पोलीसांना दिली. पोलीस हवालदार ईश्वर देशपांडे यांनी स्थळपाहणी करून पंचनामा केला. यावेळी पंचासमक्ष शाखाधिकारी एस. बी. शहा यांनी तिजोरी उघडून पैशाची खातरजमा केली. सुदैवाने शेतकऱ्यांना वाटपासाठी आलेले २९ लक्ष ४ हजार ४८७ रुपये तिजोरीत सुरक्षित होते. याप्रकरणी शाखाधिकारी एस. बी. शहा यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची तिजोरी फोडण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 12:14 AM
शहरातील देऊळगाव राजा रोडवर असलेल्या जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेतील तिजोरी लुटण्याचा अयशस्वी प्रयत्न चोरट्यांनी केला.
ठळक मुद्देजाफराबाद : तिजोरीत होते २९ लाख रूपये