फकिरा देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : भोकरदन मार्गे औरंगाबाद-बुलडाणा ही वातानुकूलित शिवशाही बस सुरू करण्यात आली होती. नवी बससेवा सुरू झाल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण होते. पण अवघ्या चार दिवसांतच ही शिवशाही नागपूरला वळवण्यात आली आहे. बुलडाणा आगाराने घेतलेल्या निर्णयावर प्रवाशांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.खाजगी ट्रॅव्हल्सला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने वातानुकूलित शिवशाही बस सुरू केली. बुलडाणा आगाराने बुलडाणा ते औरंगाबाद भोकरदनमार्गे ही बससेवा सुरू केली. मागील चार ते पाच दिवसांपासून शिवशाही सुरू असताना अचानक बस बंद करण्यात आली. भोकरदन ते औरंगाबादपर्यंत साध्या बसला ८८ तर शिवशाहीला १२६ रूपये भाडे आकारले जाते. मात्र शिवशाहीला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद होता.मात्र गेल्या चार ते पाच दिवसांपासून ही शिवशाही बस बंद करण्यात आली. ही शिवशाही बस औरंगाबाद ऐवजी नागपूरला वळवण्यात आली आहे. बुलडाणा आगाराने हा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. औरंगाबादला-बुलडाणा सुरू करण्यात आलेली बस अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याचे कारण करून ही बस बंद करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. परिवहन महामंडळाने बुलडाणा ते औरंगाबाद सुरू करण्यात आलेली शिवशाही बस परत सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे़बुलडाणा-औरंगाबाद ही वातानुकूलित शिवशाही बस बंद झाल्यामुळे भोकरदन मार्गे प्रवास करणा-या प्रवाशांत नाराजी पसरली आहे.प्रवाशांना दिलासा देण्यासाठी लातूर ते जळगाव शिवशाही बस सुरु करण्यात आली आहे. ही बस जळगावहून निघाल्यानंतर भोकरदन स्थानकावर १२.३० वाजता येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
औरंगाबाद-बुलडाणा ‘शिवशाही’ नागपूरला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 1:15 AM