लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना येथील स्व.नंदकिशोर चॅरिटेबल स्ट्रट आणि अनुभव प्रतिष्ठन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी कवितेचा पाडवा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, याच कार्यक्रमात प्रसिध्द कवी सौमित्र उर्फ किशोर कदम यांना यंदाचा राय हरिश्चंद्र साहनी दु:खी काव्य पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.हा पुरस्कार साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार सोहळा सायंकाळी सात वाजता मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात होणार आहे.या संदर्भात संयोजक विनित साहनी तसेच कवयित्री संजीवनी तडेगावकर यांनी सांगितले की, गेल्या २० वर्षापासून साहनी परिवाराकडून या कवितेच्या पाडव्याचे आयोजन करण्यात येत आहे. आतापर्यंत अनेक नामवंत साहित्यिकांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर मान्यवरांचे कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यात विजय चोरमारे, सुमित लांडे, शोभा रोकडे, बालाजी सुतार, भरत दौंडकर, आबा पाटील हे कवी सहभागी होणार आहेत.यावेळी ज्येष्ठ चित्रकार संजीवनी डहाळे, छायाचित्रकार ज्ञानेश्वर गिराम, विलास भुतेकर, कालिदास वेदपाठक यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती विनित साहनी तसेच तडेगावकर यांनी दिली आहे.
कवी सौमित्र यांना आज पुरस्काराचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2019 12:25 AM