ओबीसी मोर्चाची पूर्वतयारी; वडीगोद्रीत बैठक
वडीगोद्री : ओबीसी समाजाच्या वतीने जालना येथे काढण्यात येत असलेल्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वडीगोद्री (ता. अंबड) येथे मंगळवारी बैठक घेण्यात आली. यावेळी देविदास खटके, बळीराम खटके, पंढरीनाथ खटके, बाबासाहेब गावडे, सत्संग मुंढे, बाबासाहेब बोंबले, संजय काळबांडे, ज्ञानेश्वर गावडे आदींची उपस्थिती होती.
सात जागांवर विजय
घनसावंगी : सिंदखेड येथील ग्रामपंचायत निवडणुकीत कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ ग्रामविकास पॅनलने सात जागांवर विजय मिळविला आहे. विजयी उमेदवारांमध्ये दिगंबर आधुडे, महानंदा पांढरे, मंदाकिनी आधुडे, शशिकला सावंत, बबिता पवार आदींचा समावेश आहे.
झाडाचा वाढदिवस
बदनापूर : शहरातील पर्यावरणप्रेमी प्रकाशचंद्र लड्डा यांनी मागील वर्षी लागवड केलेल्या झाडाचा वाढदिवस साजरा केला. यावेळी झाडाला फुलांच्या माळा आणि रोषणाईने सुशोभित करण्यात आले. याप्रसंगी तापडिया, राजेंद्र दुधानी, रामस्वरूप गेलडा आदींची उपस्थिती होती.
जिनिंगला आग
जालना : शहरातील औद्योगिक वसाहत परिसरातील मुलचंद फुलचंद जिनिंगला बुधवारी रात्री आग लागली होती. अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी वेळीच दाखल झाल्याने आगीवर नियंत्रण मिळविता आले, अशी माहिती चंदनझिरा पोलिसांनी दिली आहे.
आष्टी गावात निधी संकलनास प्रारंभ
आष्टी : अयोध्या येथे उभारण्यात येत असलेल्या श्रीराम मंदिराच्या उभारणीत देशभरातील रामभक्तांचा खारीचा वाटा असावा. यासाठी मागील काही दिवसांपासून गावोगाव निधी समर्पण अभियान राबविले जात आहे. याच अनुषंगाने आष्टी (ता. परतूर) येथे बुधवारी रक्तदान शिबिर व महाआरतीने अभियानास प्रारंभ करण्यात आला.
गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव कार्यक्रम
जालना : मकर संक्रांतीनिमित्त बाथ्री तेली एकता महिला मंडळाच्या वतीने तीळगूळ कार्यक्रमासह समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम २४ जानेवारी रोजी होणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी २३ जानेवारी रोजीपर्यंत नाव नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले.
अनेक पुलांचे काम अर्धवट अवस्थेत
अंबड : मागील अनेक दिवसांपासून अंबड - जालना रस्त्याचे काम सुरू आहे. यात रस्त्याचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. असे असले तरी अनेक ठिकाणी पुलांचे काम अधुरे आहे. त्यामुळे रस्त्याला अनेक ठिकाणी वळणांचा वापर केला जात असल्याने वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.