लोकमत न्यूज नेटवर्कजालना : औरंगाबाद- जालना विधान परिषद निवडणुकीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार अंबडचे माजी नगराध्यक्ष बाबूराव कुलकर्णी यांनी गुरूवारी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.औरंगाबाद- जालना मतदार संघामध्ये काँग्रेसचे निष्ठावान म्हणून ओळख असलेल्या बाबूराव कुलकर्णींना यावेळी काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. प्रत्यक्षात या निवडणुकीत युतीची सदस्य संख्या जास्त असल्याने त्यांचीही मते आपल्याकडे वळविण्यासाठी तर कुलकर्णी यांनी गुरूवारी खोतकरांची भेट घेतली नसेल ना, अशी चर्चा आहे. दरम्यान, युतीचे उमेदवार अंबादास दानवे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी गुरूवारी सायंकाळी जवळपास अर्धा तास बंदद्वार चर्चा केली. बाबूराव कुलकर्णी यांच्या भेटीने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस मध्येही चर्चेला उधाण आले होते.या भेटीला राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दुजोरा दिला. त्यामुळे या भेटीत नेमकी कोणती चर्चा झाली हे मात्र गुलदस्त्यात आहे.औरंगाबाद- जालना विधान परिषदेच्या निवडणुकीत घोडेबाजार होत असल्याची चर्चा जोरात होती. त्यामुळे मी आणि माजे प्रतिस्पर्धी उमेदवार अंबादास दानवे यांनी राजू वैद्य यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी दोघांनीही घोडेबाजार होऊ नये आणि निवडणुका पारदर्शकपणे व्हाव्यात, यासाठी एकत्रित पत्र काढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्या पत्रावर आमच्या दोघांच्या स्वाक्षऱ्या आहेत. दरम्यान, राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची आपण भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान देखील मतदारांची पळवापळवी थांबविण्याबाबत चर्चा झाली. सद्सद्विवेक बुध्दीने मतदारांना मतदान करू द्यावे, कुठलाही राजकीय दबाव त्यांच्यावर आणू नये, अशी चर्चा झाली.- बाबूराव कुलकर्णी, उमेदवार
राज्यमंत्री खोतकर, कुलकर्णींमध्ये बंदद्वार चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2019 12:41 AM