रूग्णसंख्येत वाढ
जालना : गत काही दिवसांपासून वातावरणात सतत बदल होत आहेत. वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकला, तापीसह इतर आजाराच्या रूग्ण संख्येत मोठी वाढ होत आहे. असे असले तरी अनेकजण अंगावर आजार काढत आहेत. नागरिकांनी तज्ज्ञांमार्फत उपचार घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
लांब पल्ल्याच्या बसेस सुरू करण्याची मागणी
जालना : राज्य परिवहन महामंडळाच्या जालना आगारातून अनेक लांब पल्ल्याच्या बसेस अद्याप सुरू करण्यात आलेल्या नाहीत. या बसेस सुरू नसल्याने अनेकांना औरंगाबादेत जाऊन इतर शहरात प्रवास करावा लागत आहे. ही बाब पाहता प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी लांब पल्ल्याच्या बसेस सुरू कराव्यात, अशी मागणी होत आहे.
दुधपुरी परिसरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन
अंबड : उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने पोकरा प्रकल्पांतर्गत दुधपुरी व परिसरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी शेतीशाळा समन्वयक डॉ. एस.एन. हरडे, प्रशिक्षक समीक्षा बनसोडे यांनी विविध विषयांवर शेतकऱ्यांना माहिती दिली. तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे निरसण केले. कार्यक्रमास कृष्णा काकडे, गणेश टापरे, संतोष पाचफुले यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
वन्य प्राण्यांमुळे शेतकरी त्रस्त
अंबड : गत काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील खरिपाची पिके बहरली आहेत. परंतु, या कोवळ्या पिकांवर हरणांचे कळप ताव मारत आहेत. त्यामध्ये शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. या पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी धडपड करीत आहेत. याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन उपाययाेजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी होत आहे.
पुलाचे बांधकाम रखडल्याने गैरसोय
अंबड : तालुक्यातील गोंदी- हादगाव मार्गावरील पुलांचे बांधकाम रखडले आहे. त्यामुळे या पुलावरून वाहने चालविताना चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. जोरदार पाऊस पडल्यानंतर येथे अपघाताचाही धोका निर्माण होत आहे. ही बाब पाहता संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन या मार्गावरील पुलांचे काम पूर्ण करावेत, अशी मागणी परिसरातील वाहन चालकांसह प्रवासी वर्गातून केली जात आहे.
ReplyForward